हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून राज्यातील विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकिय घडामोडींमुळे या अधिवेशनाकडे सर्वांचेच लागले आहे. अशातच आजअधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत 3 आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी विधीमंडाळाच्या सचिवांना पत्र पाठवले असून यामध्ये मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि आमदार गोपीकिशन बजोरिया यांना अपात्र करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ठाकरे गटाने केलेल्या या मागणीमुळे या तिन्ही आमदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे विधीमंडळ सचिव या मागणीवर काय निर्णय देतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मुख्य म्हणजे, या तिन्ही आमदारांनी ठाकरे गटावर टीका करत शिंदे गटात प्रवेश केला होता. यावेळी पक्षाला नाव ठेवत आता आम्हाला शिंदे गटात सहभागी व्हायचे असल्याचे या आमदारांनी सांगितले होते. त्यामुळे याचा मोठा धक्का ठाकरे गटाला बसला होता. परंतु त्यावेळी ठाकरे गटाने या आमदारांवर कोणतीही कारवाई वा टीका केली नव्हती. मात्र आता अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या तिन्ही आमदारांना धक्का दिला आहे. ठाकरे गटाकडून मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि आमदार गोपीकिशन बजोरिया यांना अपात्र करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे याना खुर्चीत बसण्याचा नैतिक अधिकार नाही अशी मागणीही ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. सभापतींवर जेव्हा अविश्वास दाखवला जातो तेव्हा त्यांना या खुर्चीवर बसण्याचा कायदेशीर अधिकार राहत नाही. तसेच जोपर्यंत अपात्रतेचा निकाल लागत नाही तोपर्यंत निलम गोऱ्हे उपसभापतींनी त्या खुर्चीवर बसू नये, अशी भूमिका घेत विरोधकांनी सभात्याग केला. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली.