व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अजित पवारांचे आमदार शरद पवारांच्या भेटीला; राष्ट्रवादी पुन्हा एक होणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून विधीमंडळात सुरु झालेल्या अधिवेशनात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. मुख्य म्हणजे, अधिवेशनापूर्वी अचानक शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आज पुन्हा अजित पवार गटाचे मंत्री आणि आमदार शरद पवार यांच्या भेटीला पोचले आहेत. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांच्यासोबत अजित पवारांच्या आमदारांची बैठक सुरु आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत अजून काही मोठं घडतंय का? दोन्ही गट एकत्र येणार का? अशा चर्चाना उधाण आलं आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच बंड करत उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिंदे फडणवीसांच्या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानंतर काल थेट अजित पवार यांच्यासह बंड केलेल्या आमदार आणि मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यामध्ये अजित पवार देखील सहभागी होते. भेटीनंतर पवार गटात गेलेले नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार हेच आमचे दैवत राहणार असल्याचे वक्तव्य केले. त्यानंतर आज पुन्हा हेच मंत्री आपल्या आमदारांसह शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. मात्र या भेटीमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. विशेष म्हणजे, आजच्या बैठकीत देखील अजित पवार सहभागी असून शरद पवार, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात स्वतंत्र चर्चा सुरु आहे.

दरम्यान, काल घेतलेल्या भेटीनंतर अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी शरद पवार यांच्याकडे दिलगीरी व्यक्त केली आहे. तसेच यातून काही तरी मार्ग काढा अशी विनंती त्यांनी शरद पवार यांना यावेळी केली. मात्र यावर शरद पवार यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र त्यानंतर काही वेळाने आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत, आपण पुरोगामी विचार सोडणार नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केलं होत. आज पुन्हा एकदा अजित पवार आपल्या आमदारांसह शरद पवारांच्या भेटीला गेल्याने राजकीय चर्चाना उधाण आलं आहे.