…. तर पवारांच्या नेतृत्वास आणि हिमतीला सह्याद्रीने दाद दिली असती; सामनातून नाराजी?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवारी) पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. आज पुण्यात आल्यानंतर मोदींच्या हस्ते अनेक विकास कामांचे उद्घाटन देखील करण्यात येईल. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेने नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. आज प्रसिद्ध झालेल्या सामनाच्या अग्रलेखात, पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यावर आणि त्यांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारावर शिवसेनेकडून हल्लाबोल करण्यात आला आहे. तसेच या सोहळ्यात शरद पवार यांनी अध्यक्ष पद भूषवल्यामुळे देखील शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर टीका

त्याचबरोबर, “पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यात 93 वर्षांचे डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया फ्रंट’च्यावतीने काळे झेंडे दाखवून निषेध केला जाणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही सहभागी होतील. अशी विचित्र परिस्थिती पुण्यात निर्माण झाली आहे. नेते मोदींसोबत व्यासपीठावर व कार्यकर्ते हाती काळे झेंडे घेऊन रस्त्यावर मोदींविरोधात. देवा, दगडूशेठ गणराया, तूच हे त्रांगडे सोडव रे बाबा” अशा शब्दात शिवसेनेने मोदींच्या दौऱ्यावर आक्षेप घेतला आहे.

पंतप्रधान मोदींचे मौनात जाणे राष्ट्रहिताचे नाही

इतकेच नव्हे तर, “पंतप्रधान मोदी हे तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर आणि अराजकावर काहीच बोलायला तयार नाहीत. मणिपुरात आदिवासी महिलांची नग्न धिंड काढली गेली तरीही पंतप्रधान मौनात आहेत. देशाच्या नायकाने संकटकाळी मौनात जाणे राष्ट्रहिताचे नाही” अशा शब्दात शिवसेनेनं मोदींना सुनावले आहे. तसेच आजच्या सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेनं पंतप्रधान मोदींच्या पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष भूषण पद शरद पवार यांना देण्यात आल्यामुळे त्यावर देखील आक्षेप घेतला आहे.

शरद पवारांच्या हिंमतीस सह्याद्रीने दाद दिली असती

“महिन्यापूर्वी मोदी यांनीच शरद पवारांच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले व लगेच त्यांचा पक्ष फोडला. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करून सोडला. तरीही शरद पवार हे पुण्यातील आजच्या कार्यक्रमास हजर राहून मोदींचे आगत स्वागत करणार हे काही लोकांना आवडलेले दिसत नाही. शरद पवारांचे म्हणणे असे की तिनेक महिन्यांपूर्वी आपणच त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्याने मला हजर राहावे लागेल. पण पुण्यात येण्याआधी मोदींनी त्यांच्या या विशेष निमंत्रकाचा पक्ष फोडून भाजपमध्ये सामावून घेतला. त्याचा निषेध म्हणून शरद पवार हे गैरहजर राहिले असते तर त्यांचे नेतृत्व, हिंमत यास सह्याद्रीने दाद दिली असती. देशात स्वातंत्र्याचा दुसरा लढा सुरू आहे. अशा वेळी शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून लोकांच्या वेगळय़ा अपेक्षा आहेत” असे सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.