हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने ईडी, सीबीआयचा छापा पडत आहे असा आरोप होत असतो. यावरूनही शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल केला आहे. ‘भजन रामाचे; कृती रावणाची’ या मथळ्याखाली सामनातून टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीने केलेल्या कारवाईवर सुद्धा या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. पाहूया सामनामध्ये नेमकं काय म्हंटल आहे.
सत्यवचनी प्रभू श्रीराम मोदी-शहांच्या सरकारला सुबुद्धी देतील असे वाटले होते, पण ‘आडात नाही, तर पोहऱ्यात कोठून येणार?’ या उक्तीप्रमाणे सध्या या सरकारचा कारभार चालला आहे. भजन रामाचे व कृती रावणाची हेच मोदी-शहा सरकारचे उद्योग सुरू आहेत. विरोधकांना नामोहरम करायचे व त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा बेछूट गैरवापर करायचा हाच या सरकारचा उद्योग. रावण आणि कंसमामाने त्यांच्या विरोधकांना म्हणजे देव मंडळास बंदी बनवले होते. तरीही शेवटी या दोन्ही राक्षसांचा पराभव झालाच. आपल्या देशातही शेवटी राम-कृष्णाचाच विजय झाला. त्यामुळे कलियुगात ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीस बळाचा वापर केला तरी जय सत्याचा होईल. रोहित पवार यांच्या कंपन्यांवर शुक्रवारी ईडीने छापे टाकले.
रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण नेते आहेत व भाजपच्या चोर बाजारात सामील होण्याचे त्यांनी टाळले, दबाव मानला नाही. अलीकडेच त्यांनी एक युवा संघर्ष यात्रा काढली. लोकांचा त्यांना पाठिंबा मिळाला. अजित पवार वगैरे लोकांनी घेतलेल्या डरपोक भूमिकेविरुद्ध ते परखडपणे बोलत आहेत. त्यामुळे ‘ईडी’चे संकट त्यांच्यावर कोसळणारच होते. ते शेवटी कोसळलेच. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याबाबतची प्रतिक्रिया मनोरंजक व राजकीय विश्लेषकांनी अभ्यास करावी अशी आहे. श्री. फडणवीस म्हणतात, “रोहित पवारांवर छापा पडला की नाही हे माहीत नाही. मात्र पवार हे व्यावसायिक असून व्यवसायात असे प्रकार होत असतात. त्यांनी काहीच केले नसेल तर घाबरण्याचे कारण नाही.” फडणवीस यांचा हा खुलासा म्हणजे शहाजोगपणाचा उत्तम नमुना आहे. अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल वगैरे मंडळी व्यवसायात आहेत व त्यांच्या व्यवसायाचे रहस्य ईडीनेच उघड केले. ईडीने त्यांचे नरडे आवळताच या लोकांनी बेडकाप्रमाणे उड्या मारल्या.
श्री. फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे या मंडळींनी काहीच केले नव्हते तर त्यांनाही घाबरण्याचे कारण नव्हते, पण त्यांना घाबरवले. त्यांच्या घरादारांवर ईडीने छापे मारले व शेवटी या सगळयांनी भाजपच्या गटारगंगेत उडया मारताच ते पवित्र झाले. आता छापे वगैरे बंद झाले. सिंचन घोटाळा, शिखर बँक घोटाळा, जरंडेश्वर कारखाना व्यवहार, मिरची घोटाळा, मुश्रीफांचा बँक, साखर घोटाळा याबाबत श्रीमान फडणवीस यांना काहीच माहीत नाही? त्यांच्या व्यवहारात घोटाळेच घोटाळे होते, पण भाजपने त्यांचे शुद्धीकरण केले आहे. असे शुद्धीकरण सध्या रोज सुरू आहे व त्यांचे पौरोहित्य ‘ईडी’ वगैरे लोक करीत आहेत.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यामागे ‘ईडी’चे शुक्लकाष्ठ जावून त्यांच्या डोक्यावर अटकेची तलवार टांगत ठेवली गेली आहे. ‘इंडिया’ आघाडीतून बाहेर पडा नाहीतर ‘ईडी’ तुरुंगात टाकेल अशा सरळ धमक्या दिल्या आहेत. सत्येंद्र जैन, मनीष सिसोदिया या दिल्लीच्या दोन मंत्र्यांना अटक झाली. अदानीविरुद्ध आवाज उठविणारे आपचे खासदार संजय सिंह यांनाही पकडले. तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांचे लोकसभा सदस्यत्वही त्यांच्या अदानीविरोधातील भूमिकेमुळेच निलंबित केले गेले. लोकसभा निवडणुकीपूर्वी हे अटक सत्र जास्त जोर पकडेल. तामीळनाडूतही ईडीने मंत्र्यांवर हात टाकला. महाराष्ट्रात हा खेळ निरंतर सुरूच आहे. या सगळयामुळे केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे व ईडी-सीबीआयचे महत्त्व कमी झाले आहे. अर्थात ईडीने धमक्या दिल्या तरी आता लोक घाबरणार नाहीत.
देशासाठी, लोकशाही वाचविण्यासाठी लोक तुरुगात जायला तयार आहेत. केजरीवाल, सोरेन यांनी निर्भय होऊन हुकूमशाहीविरुद्ध लढण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्रात रोहित पवार यांनीही काही झाले तरी शरण जाणार नाही असा अस्सल मराठी बाणा दाखवला आहे. प. बंगालात लोकांनी ‘ईडी’ला चोप दिला आहे, ही एक प्रकारे अराजकाची ठिणगी आहे. प. बंगालात ‘ईडी’ची डोकी फुटली हे चांगले नाही, पण हे लोण देशात पसरू नये. ‘ईडी’ त्यांच्या मालकांचे आदेश पाळते, पण लवकरच मालक बदलणार आहेत. त्वामुळे हे मालक व त्यांचे चुकीचे आदेश पाळणारे ‘ईडी’ वगैरेनाही आरोपीच्या पिंजयात उभे राहावे लागेल याचे भान त्यानी ठेवायला हवे. ‘ईव्हीएम’ घोटाळा उघड झाला आहे. ईव्हीएमविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत व इंडींची डोकी फुटली आहेत. तरीही जनता लढायला तयार आहे. संपूर्ण देशात संतापाचा लाव्हा उसळतो तेव्हा हुकूमशहांना देशातून फकून जावे लागते असे जगाचा इतिहास सांगतो. इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. भजन रामाचे व कृती रावणाची ही भूमिका चालणार नाही! असे म्हणत सामनातून भाजपवर निशाणा साधण्यात आला.