चोरांना चोर म्हंटल! हा काय गुन्हा झाला? सामनातून केंद्र सरकारवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी आडनावावरून वादग्रस्त विधान केल्याबद्द्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आणि त्यांनतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. त्यांनतर शिवसेना ठाकरे गटाने आपल्या सामना अग्रलेखातून केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. चोरांना चोर म्हंटल! हा काय गुन्हा झाला? या मथळ्याखाली सामनातून केंद्रावर निशाणा साधण्यात आला आहे.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल-

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा भ्याडपणा मोदी सरकारने दाखविला आहे. चोरांना चोर म्हणण्याचे धाडस राहुल यांनी दाखविल्यामुळे घाबरलेल्या सत्ताधाऱयांनी कायदेशीर कारवाईची ही ‘मर्दुमकी’ दाखवली आहे. ‘सर्वच चोरांचे आडनाव मोदी कसे?’ असा प्रश्न राहुल गांधी यांनी कर्नाटकातील एका प्रचार सभेत विचारला होता. त्यामुळे ‘मोदीनामा’ची मानहानी झाली, असे ठरवून गुजरातमधील एक वेगळेच मोदी सुरत न्यायालयात गेले. सुरतच्या न्यायालयाने या प्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

श्री. गांधी यांना न्यायालयाने ‘माफी मागून प्रकरण मिटवा’ असा पर्याय दिला. पण गांधी यांनी माफी मागितली नाही व जामिनावर मुक्त होऊन सुरतच्या निकालाला आव्हान देण्याचा पर्याय स्वीकारला. निकालानंतर राहुल गांधींचे असे म्हणणे आहे की, ‘सत्य हाच माझा ईश्वर आहे.’ पण आजच्या युगात सत्य आणि ईश्वर अशा दोघांवरही संकटाची तलवार लटकते आहे. पंतप्रधान मोदी यांनी सध्याचा काळ हा ‘अमृतकाल’ असल्याचे सांगितले, पण या अमृतकालात चोरांना चोर म्हटले म्हणून शिक्षा ठोठावली गेली आणि चोरांना सजा मिळाली नाही.

‘गौतम अदानी व मोदी भाई भाई, देश लुट कर खाई मलई’ अशा घोषणा सध्या संसदेत दणाणत आहेत व दोन आठवडय़ांपासून संसद बंद पडली आहे. देश लुटणाऱया अदानीवर कारवाईचे नाव नाही, पण चोरांना चोर म्हटल्याबद्दल राहुल गांधी यांच्यावर न्यायालयाच्या खांद्यावरून सत्ताधारी पक्षाने गोळी झाडली आहे. याआधी बदनामी प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झाल्याचे उदाहरण आपल्या देशात नाही, पण राहुल गांधी बदनामी प्रकरणातील खटल्यात अपवाद ठरले आहेत. राहुल गांधी यांनी माफी मागितली नाही व ते बेडरपणे शिक्षेला सामोरे गेले.

राहुल गांधी हे लढत आहेत व निर्भयपणे मोदींच्या विषारी अमृतकालाचा सामना करीत आहेत याबद्दल ते कौतुकास पात्र आहेत. राहुल गांधी यांनी नीरव मोदी व ललित मोदी यांना चोर म्हटले व संपूर्ण देश आज अदानी यास चोर म्हणत आहे. त्यापैकी एकाही चोरावर अद्याप कारवाई होऊ शकलेली नाही, पण सुरतच्या न्यायालयाने कायदा व मर्यादांचे उल्लंघन करून मानहानी प्रकरणात गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. एखाद्या व्यक्तीची बदनामी झाली असेल तर कलम 500 अंतर्गत असा खटला दाखल करता येतो. ज्या व्यक्तीबद्दल भाष्य केले त्या व्यक्तीनेच खटला दाखल केला पाहिजे. एखाद्या समूहाबद्दल भाष्य असेल तर ती व्यक्तिगत बदनामी ठरत नाही. पण सुरत प्रकरणात नीरव, ललित व नरेंद्र मोदींवर भाष्य केले असताना चौथाच मोदी उपटला व त्याने मोदींची बदनामी झाली, असे सांगून मानहानी खटला दाखल केला.

गुजरातच्या न्यायालयाने तो मान्य केला व राहुल गांधी यांना गुन्हेगार ठरवले. मोदी चोर आहेत असे राहुल गांधी म्हणाले, पण ते डरपोकसुद्धा आहेत हे पुन्हा सिद्ध झाले. अर्थात जी गोष्ट देशाला सांगण्यासाठी कोटयवधी रुपये खर्च आला असता ती गोष्ट गुजरातमधील सुरत न्यायालयाने देशभरात फुकटात पोहोचवली. माध्यमांवर बंधने आहेत, पण सुरतच्या न्यायालयाने काही काळापुरते जणू ही बंधने हटवून ‘मोदी खरे कोण आहेत?’ ते देशाला दाखवले. देशातील भ्रष्टाचार दडपण्यासाठी लोकशाही व न्याय यंत्रणेची केलेली ही मुस्कटदाबी आहे असं म्हणत सामनातून केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे.