हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुप्त भेट आणि दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें आजारी असल्याने सातारा दौरा यावरून शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवार वारंवार शरद पवारांना भेटतात हा एक साथीचा आजार आहे व मुख्यमंत्री शिंदे आजारी पडून वारवार- विश्रांतीसाठी सातारयातील शेतावर हेलिकॉप्टरने उतरतात हा महाराष्ट्राला लागला मानसिक आजार आहे. या दोन्ही आजारात गुप्त असे काहीच राहिलेले नाही असं सामनातून म्हंटल आहे.
सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल?
उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीस वारंवार जात आहेत व शरद पवार या भेटी टाळत नाहीत हे गमतीचे आहे. काही भेटी उघडपणे झाल्या, तर काही गुप्तपणे झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. असा संभ्रम निर्माण व्हावा यासाठीच भारतीय जनता पक्षाचे देशी चाणक्य अजित पवारांना अशा भेटीसाठी ढकलून (पाठवतायत काय? या शंकेला बळ मिळत आहे. परंतु श्री. शरद पवार यांची प्रतिमा अशा भेटीने मलिन होते व ते बरे नाही असं ठाकरे गटाने म्हंटल आहे.
अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह भाजपची वाट धरल्यावर सगळ्यात मोठी गंमत झाली ती एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाची. आता तर शिंदे आजारी पडले असून त्यांची प्रकृती खूपच खालावली आहे. व त्यांना जबरदस्तीने इस्पितळात दाखल करू, असे शिंदे यांचे समर्थक आमदार संजय शिरसाट यांनी जाहीर केले. शिंदे हे 24 तास काम करतात म्हणून ते आजारी पडले, पण शिंदे 24 तास काम करतात ते महाराष्ट्रात कुठेही दृश्य स्वरूपात दिसत नाही. कधीही पद गमवावे लागेल या भीतीतून त्यांची झोप उडाली असेल तर ऊठसूट हेलिकॉप्टरने सातारयातील त्याच्या शेतावर आराम करतात म्हणजेच 24 तास काम व पुढचे 72 तास आराम’ असे त्यांच्या जीवनाचे गणित दिसते असा टोला सामनातून एकनाथ शिंदेंना लगावण्यात आलाय.
महाराष्ट्राच्या राजकारणास सध्या ज्या आजाराने ग्रासले आहे, त्या आजाराचा किडा मुख्यमंत्र्यांच्या शरीरात असून त्यांचा वेळीच बंदोबस्त केला नाही, तर हा किडा महाराष्ट्राचे समाजमन पोखरून काढल्याशिवाय राहणार नाही अजित पवार वारंवार शरद पवारांना भेटतात हा एक साथीचा आजार आहे व मुख्यमंत्री शिंदे आजारी पडून वारवार- विश्रांतीसाठी सातारयातील शेतावर हेलिकॉप्टरने उतरतात हा महाराष्ट्राला मानसिक आजार आहे. या दोन्ही आजारात गुप्त असे काहीच राहिलेले नाही असं म्हणत सामनातून पवार काका- पुतण्या भेटीवर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात करण्यात आला आहे.