लोकशाही म्हणजे मोदी- शहांची हुकूमशाही नाही, अजून बऱ्याच गोष्टी ठरायच्या आहेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लोकशाही म्हणजे मोदी- शहांची हुकूमशाही नाही, आणि निवडणूक आयोगाची मनमानी म्हणजे अंतिम निकाल नाही. अजून बऱ्याच गोष्टी ठरायच्या आहेत अस म्हणत सामना अग्रलेखातुन भाजप आणि शिंदे गटावर पुन्हा एकदा तोंडसुख घेण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील तथाकथित सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मिंधे गटाचे वकील सांगत आहेत, आम्ही म्हणजेच शिवसेना ! या ‘आम्ही’वर न्या. चंद्रचूड यांनी घेतलेला आक्षेप महत्त्वाचा आहे. विधिमंडळात तुमच्याकडे बहुमत आहे याचा अर्थ तुम्ही म्हणजे पक्ष होत नाही.” न्या. चंद्रचूड यांनी नेमके विधान केले आहे. विधिमंडळातील फक्त चाळीस आमदार म्हणजेच शिवसेना, असा निर्णय निवडणूक आयोगातील ईस्ट इंडिया कंपनीच्या एजंटांनी दिला काय आणि या विकतच्या बहुमतवाल्यांनी नाचायलाच सुरुवात केली, पण कितीही नाचकाम केले तरी सर्वोच्च न्यायालयात न्यायासाठी सुनावणी सुरू आहे व न्याय मेला नाही हे लवकरच कळेल अस सामनातून म्हंटल आहे.

दिवसाढवळय़ा चाळीस चोरांनी दरोडा टाकला. चाळीस जणांची चोरांची टोळी हा ‘चोरबाजार’ होऊ शकतो, पण चोरबाजार म्हणजे शिवसेना हे कसे घडेल? चोरांना रस्त्यावर अडवून जनता जागोजागी जाब विचारीत आहे. मिंधे गटाच्या भजनी लागलेले आमदार बच्चू कडू हे धाराशीव जिल्हय़ात एका कार्यक्रमासाठी गेले असता तेथील लोकांनी, आबालवृद्धांनी त्यांना घेरावच घातला. “चोर-डाकूंसोबत तुम्ही गेलात कसे? लाजलज्जा गुंडाळून ठेवलीत काय ?” असा जाब विचारून लोक त्यांची गाडी अडवू लागले तेव्हा बच्चूभाईंचा आंबट चेहरा पाहण्यासारखा झाला होता असा टोला सामनाच्या अग्रलेखातुन लगावण्यात आलाय.

सर्वच चाळीस आमदारांवर जागोजागी हीच वेळ आली. कारण शिवसेना जनतेत आहे. फक्त चार भिंतींतील घुमटाखालच्या विधिमंडळात नाही. न्या. चंद्रचूड यांनी नेमके तेच आणि तेच स्पष्ट केले आहे. लोकशाही म्हणजे मोदी-शहांची हुकूमशाही नाही व निवडणूक आयोगाची मनमानी म्हणजे अंतिम निकाल नाही. बऱ्याच गोष्टी अजून ठरायच्या आहेत अस म्हणत सामनातून मोदी आणि शिंदे गटावर निशाणा साधण्यात आला आहे.