हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून देशभरात भाजप विरोधी नेत्यांवर ईडीची कारवाई होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सामना अग्रलेखातून केंद्रातील भाजप सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. विरोधकांना कायमचे संपवायचे व लोकशाहीचाही मुडदा पाडायचा, हे ठरवूनच देशात राज्य चालवले जात आहे परंतु विरोधकांच्या स्वाभिमानातूनच क्रांतीच्या ठिणग्या पडतील आणि केंद्रीय सत्तेकडून होत असलेला अन्याय संपून जाईल. हुकूमशाहीचा अंत होईल असं म्हणत सामनातून केंद्रावर निशाणा साधण्यात आला आहे.
देशाने 1975 च्या कालखंडात इंदिरा गांधी यांनी लादलेली आणीबाणी अनुभवली आहे. त्या काळाकुट्ट कालखंडास लाज वाटावी इतक्या वेगुमान पद्धतीने भाजपचे राज्यकर्ते आज वागत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा बेकायदेशीर वापर करून राजकीय विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचे कार्य अखंड सुरू आहे. ही अघोषित नव्हे, तर घोषित हुकूमशाही देशात सुरू झाल्याची लक्षणे आहेत. गेल्या दोन दिवसात विरोधी पक्षांतील अनेकांवर ‘ईडी’ने छापे मारले व काहींना अटका केल्या, पण या अशा सर्व कारवायांपासून भाजपचे अतिप्रिय गौतमभाई अदानी सर्व करून सवरून मोकळे आहेत, त्यांना मोदी सरकारने सुरक्षेची विशेष कवचकुंडले बहाल केली आहेत. एलआयसी, स्टेट बँक बुडवणाऱ्या अदानी यांच्या वाटेला जायचे धाडस करत नाही. याचा काय अर्थ घ्यायचा? असा ते सवाल ठाकरे गटाने केला आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरी गेल्या काही काळापासून ‘ईडी’चे धाडसत्र सुरू आहे. मुश्रीफ यांच्या पत्नी या प्रकारामुळे उद्विग्न झाल्या व म्हणाल्या, “एकदाच काय त्या आम्हाला गोळ्या घाला व मोकळे व्हा!” केंद्रीय यंत्रणा ज्या निर्घृण पद्धतीने काम करीत आहेत, त्याबाबतचा हा संताप आहे. महाराष्ट्रात असंख्य साखर कारखान्यांत हिशेबाचे घोळ आहेत, पण त्यातील अनेक कारखान्यांना फडणवीस शिंदे सरकारचे अभय असल्याने ‘ईडी’ त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. श्री. मुश्रीफ यांच्याबाबत कोणीतरी सुपारी घेतल्याने त्यांच्यावर धाडी पडत आहेत. है. राजकीय सुडाच्या सुपारीचे प्रकरण आहे. सहकार क्षेत्रातील अनेक बरबटल्या हातांचा पाठिंबा फडणवीस सरकारला आहे, पण कारवाई फक्त मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबावरच होत आहे.
विरोधकांना कायमचे संपवायचे व लोकशाहीचाही मुडदा पाडायचा, हे ठरवूनच देशात राज्य चालवले जात आहे. या सरकारने सर्व घटनात्मक संस्था आपल्या टाचेखाली घेतल्या, निवडणूक आयोग खिशात घातला, न्यायालयात आपली माणसे नेमून घेतली. मग उरले काय? आता संविधानही बदलले जाईल किंवा हवे तसे नवे संविधान लिहून घेतले जाईल असेच वातावरण आहे.
लालू यादव, मनीष सिसोदिया यांनी परखडपणे सांगितले, “कितीही छळ करा. आम्ही गुडघे टेकणार नाही. महाराष्ट्रात संजय राऊत, अनिल देशमुख, नवाब मलिक यानीही गुडघे टेकले नाहीत. सगळेच मिचे नाहीत. बरेच जण ताठ पाठवण्याचे, स्वभिमानी आहेत. देशाला तोपर्यंत भय नाही. या स्वाभिमानातूनच क्रांतीच्या ठिणग्या पडतील आणि केंद्रीय सत्तेकडून होत असलेला अन्याय संपून जाईल. हुकूमशाहीचा अंत होईल. इतिहास तेच सांगतो असं म्हणत सामनातून मोदी सरकारला इशारा देण्यात आला आहे.