मुंबई लोकलची गर्दी होणार कमी; आता थेट ‘या’ स्थानकापर्यंत मेट्रो धावणार

Mumbai Local Train
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील मुंब्रा येथे झालेल्या अपघातानंतर एमएमआरडीएने मोठा निर्णय घेतला आहे. लोकलमधील ( Mumbai Local Train) गर्दी हलका व्हावा, प्रवाशांना आरामात प्रवास करता यावा यासाठी एमएमआरडीएने मोठं पाउल उचललं आहे. त्यानुसार आता ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो लाइन 5 आता उल्हासनगरमार्गे अंबरनाथपर्यंत नेण्यात येणार आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली. एमएमआरडीए आयुक्त डॉ.संजय मुखर्जी यांच्या मुख्य उपस्थितीत आज एमएमआरडीए मुख्यालयात एक महत्वाची बैठक पार पडली. यावेळी बैठकीत श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

श्रीकांत शिंदे म्हणाले, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ प्रकल्प आता दुर्गाडी नाका ते कल्याणमार्गे उल्हासनगरच्या कल्याण बदलापूर मार्गाने उल्हासनगर आणि अंबरनाथ शहराच्या मध्यभागी उभे राहत असलेल्या चिखलोली रेल्वे स्थानकापर्यंत नेण्यात येणार आहे. यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना मुंबई आणि ठाणे गाठणे सोपे होणार आहे. याबाबत एमएमआरडीएला जलदगतीने विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

चिखलोली येथे होणार रेल्वे-मेट्रो इंटिग्रेशन. यामुळे एकाच ठिकाणी रेल्वे व मेट्रो सेवा उपलब्ध होणार असून प्रवाशांना सहज, जलद आणि सुसंगत प्रवास करता येणार आहे. या दोन्ही मेट्रो प्रकल्पांच्या विस्तारीकरणामुळे अंबरनाथ, उल्हासनगर, शहाड परिसरात थेट मेट्रो सेवा उपलब्ध होणार असून बदलापूर-अंबरनाथहून मुंबई – ठाणे प्रवास सुलभ होणार आहे. तर यामुळे लोकल ट्रेनवरील ताण कमी होणार असून वाहतुक जलदगतीने होणार आहे. तसेच वेळ, इंधन आणि पर्यावरण यांची मोठी बचत होणार आहे. अशी माहिती श्रीकांत शिंदेनी दिली.

यावेळी बैठकीला आमदार डॉ.बालाजी किणीकर, आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, रवी पाटील, राजेश कदम यांच्यासह एमआरडीए अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार, अश्विन मुदगल, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.