सातारा जिल्ह्यातील मांढर देव यात्रा रद्द; प्रशासनाकडून जमावबंदीचे आदेश

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात दरवर्षी काळेश्वरी देवी (मांढरदेव) व दावजी बुवा (सुरुर) हि यात्रा आयोजित केली जाते. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व यात्रेच्या निमित्ताने होणारी गर्दी पाहता प्रशासनाच्यावतीने यंदाच्या वर्षीची मांढरदेव यात्रा हि रद्द करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी दि. 10 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2022 या कालावधीत 144 कलम लागू केले असून जमावबंदीचे आदेश दिले आहेत.

वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री. काळेश्वरी देवीची आणि सुरुर येथील धावजी बुवाची वार्षिक यात्रा दि. 16 ते 18 जानेवारी रोजी आहे. या यात्रे निमित्ताने महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र राज्यातील लाखो भाविक दरवर्षी देवीच्या दर्शनासाठी येतात. यात्रेचा मुख्य दिवस शांकभरी पोर्णिमेला (दि.17 जानेवारी) रोजी आहे. या दिवशी तसेच प्रत्येक मंगळवार, शुक्रवार या देवीच्या वारी आणि आमवस्या, पोर्णिमेला अशी यात्रेपूर्वी 15 दिवस आणि यात्रेनंतर 15 दिवस याठिकाणी भाविकांकडून मोठी गर्दी केली जाते.

यात्रेत मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेत तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी जमाव बंदीचा आदेश लागू केला आहे. प्रांताधिकाऱ्यांनी लागू केलेल्या आदेशानुसार काळूबाई देवी यात्रा व दावजी बुवा यात्रा सुरुर यात्रा आयोजित करता येणार नाही. तसेच गर्दी होण्याच्या दृष्टिकोनातून धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये.

यात्रेतील धार्मिक कार्यक्रम मंदिराचे पुजारी व ट्रस्टचे सदस्य यांनीच पार पाडावी. त्याव्यतिरिक्त इतर व्यक्तींना कार्यक्रमास उपस्थित राहण्यास मनाई असेल. तसेच यात्रा कालावधीत ट्रस्टी व पुजारी वगळून इतर व्यक्तींना दर्शनासाठी बंद असेल. त्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना कार्यक्रमास उपस्थित राहण्यास मनाई असेल. तसेच यात्रा कालावधीत ट्रस्टी व पुजारी वगळून इतर व्यक्तींना दर्शनासाठी बंद असेल. यात्रा कालावधीत भाविकांना तसेच स्थानिकांना रहिवासासाठी तंबू उभारण्यास तसेच पशू व पक्षी यांचा बळी देण्यास मनाई करण्यात आली आहे.