औरंगाबाद – तब्बल वीस महिन्यानंतर पहिली ते चौथीच्या चिमुकल्यांनी काल शाळेची वाट धरली. आईवडील आपल्या मुलांना शाळेच्या प्रांगणात सोडत होते. कुणाला मित्रांसोबत खेळायला मिळण्याचा आनंद होता, तर कुणी शाळेच्या भीतीने रडतखडत वर्गाकडे गेले. शाळांकडून नही फुगे, गुलाबपुष्प, बिस्किट देऊन तसेच रांगोळ्यांनी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
ग्रामीण भागातील उत्साही कारभारी ही या उत्सवात सहभागी झाले. पहिल्याच दिवशी बिस्किटांचा खाऊ विद्यार्थ्यांना देण्यात आला. नियमांवर शिक्षकांकडून कटाक्ष आणि विद्यार्थ्यांच्या मस्तीत शाळेची पहिली घंटा वाजली. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने उत्साही वातावरणात जिल्ह्यातील पहिली ते चौथीच्या 2 हजार 494 शाळा सुरू झाल्या. कालपासून ग्रामीण भागातील वर्ग सुरू झाल्याने आता पहिली ते बारावी चे सर्व वर्ग नियमित सुरू झाले आहेत. पहिल्या दिवशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. जिल्ह्यात पहिली ते चौथी चे वर्ग 2 हजार 650 शाळांमध्ये आहेत.
काल पहिल्या दिवशी 2 लाख 11 हजार 635 विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 19 हजार 109 विद्यार्थ्यांनी हजेरी लावल्याचे प्रभारी शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी सांगितले. पहिलीत प्रवेश होऊनही शाळा न पाहिलेल्या विद्यार्थ्यांनी काल प्रथमच वर्ग पाहिले. झालेले नुकसान भरून काढणे आणि विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लावणे. हे प्राथमिक शाळांच्या शिक्षकांनी समोरील मोठे आवाहन असेल.