सांगली | जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. अशातच रेमडीसीव्हीर इंजेक्शनची मागणी देखील वाढत आहे. याचाच गैरफायदा उचलत अव्वाच्या सव्वा दराने गरजू रुग्णांना हे इंजेक्शन विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश सांगली पोलिसांनी केला आहे. जीवनावश्यक वस्तूमध्ये समावेश असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनच काळ्याबाजाराने विकत असताना मिरज शासकीय रुग्णालयातील अधिपरीचारकासह एका खाजगी लॅब टेक्निशियनला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून अटक केली.
अधिपरीचारक सुमित सुधीर हुपरीकर (वय ३२ रा.समृध्दीनगर, विश्रामबाग) व लॅब टेक्नेशियन असलेला दाविद सतिश वाघमारे (वय २५, रा. कुपवाड रोड, विजयनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघांनी यापूर्वी ८९९ रुपयांचे इंजेक्शन ३० हजार रुपयांना एक असे दोन इंजेक्शन विकल्याचे कबुली दिली आहे. या दोघांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम तसेच औषध प्रशासन अंतर्गत विश्रामबाग पोलिसात गुन्ह दाखल झाला आहे.
संपूर्ण देशासह राज्यात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरली आहे. सांगली जिल्ह्यात सुद्धा कोरोना बाधित रुग्णांची संख्या हि आता हजारोंच्या घरात गेली आहे. कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत असताना रुग्णांच्या नातेवाईकांकडून रेमडिसीवीर इंजेक्शनची मागणी होत आहे. अशातच रुग्णांच्या हतबलतेचा फायदा अनेकजण उचलत असल्याचे समोर येत आहे. मोठ्या प्रमाणात रेमडीसीव्हीर इंजेक्शनची मागणी होत असल्याने त्याचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांची टोळी जिल्ह्यात सक्रिय झाली होती. या टोळीचा प्रमुख हा मिरजेतील शासकीय रुग्णालयातील कोविड विभागात काम करणारा अधिपरिचारकच असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
सुमित हुपरीकर हा मिरज शासकीय कोविड रूग्णालयात अधिपरिचारक म्हणून कोव्हिड सेक्शनमध्ये काम करीत आहे. त्या ठिकाणी दाखल असलेल्या पेशंटना दवाखान्यातील उपलब्ध साठ्यातून प्रति व्यक्ती सहा डोस दिले जातात. त्यानंतर उपाचरा दरम्यान पेशंटचा मृत्यू झाल्यास इतर डोस हे शिल्लक राहिले असतात. शिल्लक राहिलेले हे डोस अधिपरिचारक त्यांच्या ताब्यात ठेवतात. शिल्लक राहिलेले कॅडिला हेल्थ केअर कंपनीचे रेमडेसिवीर घटक असलेले रेमडॅक १०० एमजी/ व्हायल इंजेक्शन, बाटलीचे लेबलवरील बॅच नंबर, मॅन्युफॅक्चर डेट, एक्फाईरी डेट, मॅक्सीमन रिटल प्राईस, पर पॅक समोरील माहिती खरडून काढून गरजू पेशंटना हेरून विकत होते.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी तातडीने याची गंभीर दखल घेत पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने हे दोघे एका रुग्णाला रेमडीसीव्हीर देण्यासाठी वॉलनेसवाडी येथे थांबले असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकून हुपरीकर व वाघमारे यांना ताब्यात घेतले. हुपरीकर याच्या पॅन्टच्या उचव्या खिशात रेमडीसीव्हीर इंजेक्शन मिळून आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी हे इंजेक्शन काळा बाजारने विण्यासाठी आणल्याची कबुली दिली. शासकीय दराप्रमाणे हे इंजेक्शन ८९९ रुपयांना मिळते मात्र हे दोघे जण ३० हजार रूपयास इंजेक्शन असे दोन इंजेक्शन विकल्याचे सांगितले. दोघांनाही ताब्यात घेतले असून दोघांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात औषध किंमत नियंत्रण आदेशा कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा