औरंगाबाद- उस्मानाबाद नामांतराबाबत मोठी अपडेट; या दिवशी होणार सुनावणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Usmanabad) नामांतराच्या मुद्दयासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. नामांतराला आव्हान देणाऱ्या याचिकेवर येत्या 4 ते 5 ऑक्टोबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे (Bombay High Court) मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ एस. डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी होईल. त्यामुळे आता या याचिकेच्या सुनावणीकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगरमध्ये तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर केले होते. मात्र याला विरोध दर्शवत या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ज्याची अंतिम सुनावणी 4 ते 5 ऑक्टोबर रोजी होईल.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याच्या काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराची घोषणा केली होती. त्यानंतर त्वरित शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंचा निर्णय रद्द करून या नामांतराबाबत नव्याने निर्णय घेतला. या नामांतराला केंद्र सरकारकडून देखील परवानगी देण्यात आली होती. मात्र त्यानंतर या निर्णयाला विरोध करणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. गेल्या अनेक दिवसांपासून या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू होती.

आता न्यायालयाने या प्रकरणात दोन्ही पक्षाच्या बाजू व्यवस्थितपणे ऐकून घेतल्या आहेत. तसेच सरकारने देखील आपली भूमिका न्यायालयासमोर मांडली आहे. आता या सर्व घडामोडीनंतर येत्या 4 ऑक्टोबरला औरंगाबादच्या याचिकेवर आणि 5 ऑक्टोबरला उस्मानाबादच्या याचिकेवर सुनावणी होईल. ही या याचिकेवरील अंतिम सुनावणी असेल. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या नामांतराच्या निर्णयावर अनेकांनी सहमती दाखवली होती. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला हा मुद्दा उद्धव ठाकरे यांनी सोडवल्यामुळे जनतेकडून त्यांचे आभार मानण्यात आले होते. मात्र त्यांचा हाच निर्णय आता न्यायालयाच्या कचाट्यात अडकला आहे.