औरंगाबादला दिलासा ! आफ्रिकेतून आलेला ‘तो’ विद्यार्थी नेगेटिव्ह

औरंगाबाद – संपूर्ण जगाने धसका घेतलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा आपल्या भागात शिरकाव होऊ नये, यासाठी स्थानिक पातळीसह देशभरातील यंत्रणा खबरदारी घेत आहे. दक्षिण आफ्रिकेत हा विषाणू सर्वप्रथम आढळून आल्याने तेथून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आफ्रिकेतून औरंगाबादेत आलेल्या विद्यार्थ्याबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने औरंगाबादला दिलासा मिळाला आहे.

हा विद्यर्थी आफ्रिकेतून 26 नोव्हेंबर रोजी मुंबईत आल्यावर त्याची मुंबई आणि पुढे औरंगाबाद विमानतळावर त्याची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. तेथे निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर त्याला दोन्ही ठिकाणहून सोडून देण्यात आले होते. तोपर्यंत त्याला क्वारंटाइन करण्यात आले नव्हते. अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनानेही त्याची तपासणी केली. तो अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्याला 4 डिसेंबरपर्यंत फॉरेन स्टुडंट्स होस्टेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे.

तसेच मागील 15 दिवसात विदेशातून आलेल्या व्यक्तींचे ट्रेसिंग सुरु असून त्यापैकी 18 जणांची काल आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल आज शुक्रवारी येणार आहे. तर तीन जण बाहेरगावी असल्याने त्यांची चाचणी शनिवारी होईल. मागील 15 दिवसांत परदेशातून आलेल्या 32 जणांची औरंगाबाद विमानतळावर नोंद आहे. त्यापैकी 22 जण औरंगाबादचे रहिवासी आहे. त्यांची यादी मिळवून मनपाच्या आरोग्य विभागाने या लोकांशी संपर्क साधून त्यांना चाचणीसाठी आरोग्य केंद्रात बोलावले होते.

You might also like