औरंगाबाद – राज्यभर गाजलेल्या मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्रा. डॉ. राजेंद्र शिंदे यांचा खून खटल्यात नवीन घडामोड समोर आली आहे.
शहर पोलिसांनी ‘ज्युवेनाईल जस्टीस केअर अँड प्रोटेक्शन रुल्स’ (जेजे ॲक्ट) या कायद्यातील तरतुदीनुसार 16 वर्षांवरील मुलास प्रौढ समजण्यात यावे अशी मागणी करणारा अहवाल मुदतीत बाल न्याय मंडळासमोर सादर केला होता. त्याची प्राथमिक तपासणी करून बाल न्याय मंडळाने दोषारोपपत्रात अहवाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आंकडे पाठवला. त्याचे अवलोकन करून प्रमुख न्यायाधीशांनी पोलिसांची मागणी ग्राह्य धरत विधिसंघर्षग्रस्त बालकास प्रौढ समजण्यात येऊन खटला न्यायालयात चालविण्यास मान्यता दिली आहे. तसेच हा खटला सत्र न्यायाधीश एस. एस. देशपांडे यांच्याकडे वर्ग केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 जानेवारी रोजी होईल.
या निर्णयाच्या विरोधात विधिसंघर्षग्रस्त मुलगा उच्च न्यायालयात जाण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. दोषारोप पत्र बनवण्यासाठी तपास अधिकारी निरीक्षक अविनाश आघाव, अंमलदार सुनील बडगुजर यांनी परिश्रम घेतले.
43 खंड 591 पानांचे दोषारोपपत्र –
तपास अधिकाऱ्यांनी शिंदे खून खटल्यात तब्बल 43 खंडात 591 पानांचे दोषारोपपत्र बाल न्याय मंडळासमोर सादर केले आहे. यात तब्बल 75 साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. यामध्ये प्रत्येक पुराव्याचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले आहे. डॉ. शिंदे यांच्या नातेवाईकांचे सविस्तर जबाब नोंदविण्यात आले आहेत. तसेच तांत्रिक तपासात सापडलेले विविध पुरावे देण्यात आले आहेत.