सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
राज्यात महिलांवर अत्याचाराचे प्रकार वाढतच आहेत. महिलांचे संरक्षण करणारा शक्ती कायदाही राज्य सरकारकडून अर्धाच मांडण्यात आल्याची टीका भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे यांनी केली. पुढील अधिवेशनात हा कायदा पूर्ण करण्याची मागणी भाजप महिला मोर्चाच्यावतीने केली जाईल. आगामी निवडणुकांच्या पार्श्र्वभूमीवर भाजपने महिलांचे बुथ सक्षम करण्यावर भर दिला आहे. त्याची अंमलबजावणी सांगली जिल्ह्यातही करण्यात येणार आहे. टिळक स्मारक मंदिरात सांगलीसह कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष खापरे यांच्या उपस्थितीत पार पडली.
या बैठकीला पश्र्चिम महाराष्ट्राच्या महिला मोर्चाच्या प्रभारी सुवर्णाताई पाटील, राज्य सरचिटणीस अश्र्विनीताई जिचकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष व नगरसेविका स्वाती शिंदे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. उषाताई दशवंत, माजी महापौर संगीता खोत, नगरसेविका भारती दिगडे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. प्रदेशाध्यक्षा खापरे म्हणाल्या, राज्यात महावकास आघाडीचे सरकार येऊन दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. परंतु दोन वर्षात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. शेतकरी, तरुणांचे प्रश्र्न सुटताना दिसत नाहीत.
महिलांवर अन्याय होवूनही त्यांच्या अहवालामध्ये ही गफलत केली जात आहे. अनेक घटना दडपण्याचा प्रयत्न सरकार पोलीस आणि सरकारी रुग्णालयांच्या माध्यमातून करीत आहे. महिला सक्षमीकरणाच्या बाता मारायच्या परंतू प्रत्यक्षात सुरक्षा मिळलेली नाही. महिला सुरक्षेबाबत राज्य सरकार अपयशी ठरले. महिलांना सुरक्षा देणारा शक्ती कायदा करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकारने कायदा लागू केला आहे. मात्र तोही अर्धाच मांडण्यात आल्याचे दुर्दैव आहे. महिलांच्या प्रश्र्नावर पक्षीय राजकारण तरी बाजूला ठेवले पाहिजे, अशी आमची आग्रही मागणी राहिल. पुढील अधिवेशनात तरी राज्यसरकारने शक्ती कायदा पूर्ण मांडवा अन्यथा राज्यभर भाजप महिला मोर्चा आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.