हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असून मराठा समाज ठिकठिकाणी आक्रोश मोर्चा काढत आहे. दरम्यान सोलापूर येथील मराठा आक्रोश मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक आणि माजी आमदार नरेंद्र पाटील ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. हे सरकार ब्रिटीशांपेक्षाही वाईट आहे, अशी टीका नरेंद्र पाटील यांनी केली.
राज्यात अनेक मोर्चे निघाले. अनेक आंदोलने झाली. त्यांना परवानगी दिली गेली. ते मोर्चे मोडीत काढले नाहीत. फक्त मराठा मोर्चेच अडवले जात आहेत, असा गंभीर आरोप नरेंद्र पाटील यांनी केला. ब्रिटीशांनीही कधी आंदोलने दडपली नाहीत. पण हे सरकार आंदोलन दडपत आहे. हे सरकार ब्रिटीशांपेक्षाही वाईट आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली.
मराठा आक्रोश मोर्चासाठी आम्ही परवानगी मागितली. पण परवानगी नाकारण्यात आली. आज सांगून मोर्चा काढला तर एवढी यंत्रणा उभी केली. उद्या न सांगता मोर्चा काढला जाईल. मग पाहू पुढे काय होते ते, असंही नरेंद्र पाटील म्हणाले.