औरंगाबाद | शहरात गेल्या आठ दिवसांपासून सर्दी, ताप, अंगदुखीच्या रूग्णांमध्ये वाढ झाली असल्याने खासगी डॉक्टरांकडे रूग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या भीतीने काही नागरिकांनी रांगा लावून टेस्ट करून घेतल्या. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले, त्यामुळे डॉक्टरांनीही आता संसर्गजन्य आजाराचे औषधोपचार सुरू केले आहेत.
मागील वर्षीचा अनुभव पाठीशी असल्याने नागरिक आता न घाबरता पालिकेच्या तपासणी केंद्राला रांगा लावून टेस्ट करून घेत आहेत. दररोज ५ हजार तपासण्या होत असून, त्यात ७०० ते ८०० नागरिक पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले असले तरी बहुतांश नागरिकांना ताप, सर्दी, अंगदुखीच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. शहरातील खासगाी डॉक्टरांकडे दिवसभरातून किमान १०० रूग्ण व्हायरल आजाराचे येत आहेत. डॉक्टर रूग्णांना नेहमीप्रमाणे व्हायरल डिसीज समजून औषधोपचार करीत आहेत. तीन ते चार दिवसांनंतरही ताप कमी न झाल्यास कोरोना तपासणी केली जात आहे. त्यात बहुतांश नागरिक निगेटिव्ह येत आहेत. कितीही औषध गोळ्या घेतल्या तरी रूग्णांना अशक्तपणा, अंग दुखणे थांबत नाही, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
रूग्णसंख्या प्रचंड वाढली – वातावरणातील बदलांमुळे शहरात ताप असलेल्या रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे डायरिया आणि सर्दीच्या रूग्णांची संख्याही वाढल्याचे सध्यातरी दिसत आहे. तीन ते पाच दिवसांत ती कमी न झाल्यास रूग्णांनी ताबडतोब कोरोना टेस्ट करावी, असेही आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.