सलमानच्या ‘राधे’वर मनोजचा ‘फॅमिली मॅन’ भारी; चाहते म्हणतायत ‘राधे’वरची व्हॅक्सिन आली…!

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता मनोज बाजपेयी यांची ऍमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘द फॅमिली मॅन’ हि वेब सिरीज तुफान गाजली होती. त्यानंतर लगेचच या वेब सिरींजचा दुसरा भाग येण्याची लोक वाट पाहत होते. आता वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर आज या वेब्सिरीजचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर पाहून चाहते अगदीच भारावून गेले आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांनी याबाबत एकापेक्षा एक भन्नाट अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोबत या ट्रेलरची प्रशंसा करीत राधे चित्रपटाची चेष्टा करणारे जबरदस्त मीम्सही व्हायरल झाले आहेत.

एका युजरने तर या ट्रेलरबाबत व्यक्त होताना अशी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे कि या प्रतिक्रियेने सगळ्यांचेच लक्ष वेधले. ‘अखेर सलमानच्या राधेवरची व्हॅक्सिन सापडली’ असे म्हणत या युजरने थे फॅमिली मन २ च्या ट्रेलरची प्रशंसाही केली आणि सोबत राधे चित्रपटाची खिल्लीही उडविली आहे. तर, ‘राधेवरची व्हॅक्सिन ४ जूनला येतेय, अपॉइमेंट तयार ठेवा,’ असेही एका युजरने लिहिले.

तर अन्य एका एका युजरने याच्याही पुढची लेव्हल गाठली आहे. ‘मी मनोरंजनाचा पहिला डोस घेतला आहे आणि ४ जूनला दुसरा डोस घेणार आहे,’ असे या युजरने लिहिले. एकंदर काय तर ‘द फॅमिली मॅन २’चा हा दमदार ट्रेलर लोकांना चांगलाच भावला आहे. त्यामुळे वेब सीरिजच्या प्रदर्शनासाठी लोक प्रचंड उत्सुक आहेत. येत्या ४ जूनला ‘द फॅमिली मॅन २’ प्रदर्शित होत आहे. अ‍ॅमेझॉन प्राईमवर ही वेबसीरिज प्रेक्षकांसाठी उपलब्ध असेल.

‘द फॅमिली मॅन ‘चा ट्रेलर अतिशय जबरदस्त, रंजक आणि दमदार आहे. २ मिनिट ४९ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये मनोज बाजपेयीने साकारलेल्या श्रीकांत तिवारीची कुटुंब आणि काम यांच्या मधोमध अडकलेली कथा दिसते. या सीझनमध्ये श्रीकांत तिवारी नवीन, शक्तिशाली व क्रूर प्रतिस्पर्धी राजीचा सामना करणार आहे. विशेष म्हणजे, दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी हिने यात राजी हि भूमिका साकारली आहे. एक फॅमिली मॅन व जागतिक दर्जाचा गुप्तचर अशा दुहेरी भुमिकेत मनोजला पाहणे चाहत्यांसाठी एक पर्वणी असणार आहे.

मुख्य म्हणजे या सीरिजच्या माध्यमातून दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी हिंदी चित्रपटसृष्टी आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. मनोज वाजपेयी आणि समंथासोबत प्रियामणि, शारिब हाशमी, सीमा बिस्वा, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर हे कलाकारदेखील हटके आणि महत्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत.