दुचाकीस्वारांना वाचविताना ट्रक पलटला; कोल्ड्रिंक्सचे बॉक्स घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

औरंगाबाद – राँग साईडने आलेल्या ट्रिपल सीट दुचाकीस्वारांना वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक रस्त्याखाली गेल्याची घटना सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास मुंबई-नागपूर महामार्गावरील तीसगावच्या खवड्या डोंगराजवळ घडली. यामुळे दुचाकीस्वार वाचले परंतु, ट्रक उलटून शीतपेयाचे बॉक्स खाली पडले. यामुळे शीतपेयांचे बॉक्स लांबविण्यासाठी वाहनधारक व नागरिकांची झुंबड उडाली होती.

गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील कोकाकोला या कंपनीतुन शितपेयाचे बॉक्स भरुन आर.के.ट्रॉन्सपोर्टचा ट्रक (क्रमांक जी.जे.01, एफ.टी.4827) या ट्रकचा चालक मगन हा १ डिसेंबरला वाळूज एमआयडीसीत बॉक्स पोडचविण्यासाठी निघाला होता. दरम्यान, मुंबई-नागपूर महामार्गावरुन लासुरमार्गे वाळूज एमआयडीसीत येत असतांना आज सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास तीसगावच्या खवड्या डोंगराजवळ राँग साईडने सुसाट वेगाने ट्रिपल सीट दुचाकीस्वार ट्रक समोर आले. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याच्या खाली उतरविल्याला. हा ट्रक एका बाजुने कलंडला होता. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ट्रक चालक मगन ट्रक बाहेर काढण्यासाठी क्रेनच्या शोधात निघुन गेला. हीच संधी साधत काही नागरिकांनी शीतपेयांचे बॉक्स लंपास केले.

ट्रकमधील शीतपेयांची बॉक्स लांबविण्यासाठी झुंबड
ट्रकजवळ कोणी नसल्याची संधी साधत लगतच्या वसाहतीतील नागरिक, प्रवासी वाहनधारकांनी शितपेयांचे अनेक बॉक्स हातोहात लांबवले. हा प्रकार लक्षात येताच मुजाहेद शेख व लगतच्या व्यवसायिकांनी नागरिकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेकांनी ट्रकमधील बॉक्स वाहनात तसेच डोक्यावर घेऊन पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोना. भानुुदास पवार, पोकॉ. रविंद्र लाटे यांनी घटनास्थळ गाठल्याने बॉक्स लांबविणारे पसार झाले. या ट्रकमध्ये असलेल्या एकुण 972 शितपेयाचे बॉक्सपैकी 108 बॉक्स गायब झाल्याचे ट्रकचालक मगन व त्याचा साथीदार प्रदीपसिंग यांनी सांगितले.

You might also like