औरंगाबाद – अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने आधी काटा काढला. त्यानंतर हे उघड होऊ नये, म्हणून पतीचा मृतदेह पिसादेवी येथील पुलाखाली पाण्यात टाकून दिला. मात्र, तक्रार दाखल होताच तपासादरम्यान पत्नीने प्रियकराच्या मदतीने तसेच प्रियकराने दोघांना सुपारी दिली, अशा चौघांनी अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पती रामचंद्र जायभाये यांचा काटा काढल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणाला सुपारी दिल्याचे उघड होताच आता गुन्ह्याला वेगळेच वळण लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या प्रकरणी २० ऑक्टोबर रोजी पिसादेवी पुलाखाली पाण्यात एक मृतदेह आढळल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांनी खुनाच्या संशयावरून तपास करण्यास सुरवात केली असता रामचंद्रच्या खिशातील आधार कार्डवरून त्याची ओळख पटली होती. दरम्यान, मृताच्या भावाने पोलिस ठाण्यात त्याच्या भावजयीने म्हणजेच रामचंद्रची पत्नी मनीषा जायभाये हिने खून केल्याची फिर्याद दिली होती. पोलिसांनी मनीषाला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच तिने तोंड उघडत खुनाची कबुली दिली. ही कारवाई चिकलठाणा ठाण्याचे सहायक गजानन जाधव, उपनिरीक्षक बालाजी ढगारे, उपनिरीक्षक अशोक रगडे, उपनिरीक्षक अश्विनी कुंभार, अजिनाथ शेकडे, बाबासाहेब मिसाळ, सुरेश साळवे, रवींद्र साळवे, दीपक देशमुख, दीपक सुरोशे, विशाल नरवडे, सुग्रीव घुगे, विशाल लोंढे, गणेश खरात, कृष्णा बरबडे, सचिन रत्नपारखे, तनुजा गोपाळघरे, ज्योती जैस्वाल, सीमा घुगे यांनी केली.
पोलिसांनी मृताची पत्नी मनीषा हिच्यासह तिचा प्रियकर गणेश ऊर्फ समाधान सुपडू फरकाडे (रा. बनकिन्होळा, ता. सिल्लोड) यांना अटक केली. त्यानंतर सुपारी दिलेले दोघे आरोपी राहुल आसाराम सावंत (रा. सातारा परिसर), निकितेश अंकुश मगरे (रा. बालाजीनगर) या दोघांना अटक केली. पोलिसांना खुनाची कबुली देताना आरोपींनी सांगितले की, २० ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजेदरम्यान रामचंद्र जायभाये हे घरात झोपलेले होते. त्यावेळी मनीषाचा प्रियकर गणेश ऊर्फ समाधान फरकाडे याच्यासोबत राहुल सावंत, निकितेश मगरे असे तिघे घरी आले. मनीषा, गणेश आणि निकितेश या तिघांनी रामचंद्र यांचे हातपाय धरले, तर राहुल सावंत याने रामचंद्र यांचे तोंड दाबून त्यांच्या मानेवर धारदार चाकूने वार केला. दरम्यान, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रामचंद्र यांचा जीव गेला.
एक लाख रुपयात दिली खुनाची सुपारी
रामचंद्र जायभायेंचा खून करण्यासाठी दुसऱ्या दोघा आरोपींना मनीषा आणि तिचा प्रियकर फरकाडे या दोघांनी एक लाख रुपयांची सुपारी दिली होती. या पैशांमध्ये रामचंद्र यांचा खून करून मृतदेहाची विल्हेवाटही लावण्याचे ठरले होते. मात्र खून केल्यानंतर चौघांनी मिळून पिसादेवी पुलाच्या जवळील नाल्यात रामचंद्र यांचा मृतदेह टाकला होता.