तर आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | सध्या राज्यावर कोरोनाचे संकट आले आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास १० हजार वर पोहोचली आहे. अशात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपदच धोक्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे यांच्या आमदारकी निवडीबाबत अद्याप निर्णय जाहीर केलेला नाही. विरोधीपक्ष या संधीचा योग्य फायदा उठवून राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. यापार्श्वभुमीवर जर ठाकरे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला तर आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री होऊ शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळाने मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन ठाकरे यांच्या आमदारकीबाबत शिफारस केली होती. तज्ञांच्या मतानुसार राज्यपालांना मंत्रीमंडळाची शिफारस मान्य करावीच लागते. त्यामुळे उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री कायम राहतील आणि राज्यपाल ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणुन नियुक्त करतील असं बोललं जात आहे. मात्र समजा काही कारणाने उद्धव ठाकरे य‍ांना आमदार म्हणुन नियुक्त केले गेले नाही तर शिवसेनेकडून प्लान बी म्हणुन आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये आदित्य ठाकरे यांना तात्पुरते मुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते. महाविकास आघाडिचे सरकार सत्तेत येईपर्यंत शिवसेनेची एक अट होती. ती म्हणजे मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असणार. आता या तांत्रीक कचाट्यात शिवसेना मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडणे कदापी शक्य नाही. तसेच आदित्य हे वरळी मतदार संघातून लोकनियुक्त आमदार आहेत. त्यांना आता पर्यावरण मंत्री पदाचा अनुभव देखील आहे. त्यामुळेच मुख्यमंत्रीपदासाठी त्य‍ांच्या नावाची चर्चा होत आहे. मात्र अगदी शेवटचा पर्याय म्हणुन याकडे पाहिले जात आहे.

वास्तविक राज्यपालांनी मंत्रिमंडळाचा निर्णय फेटाळल्यावर पुन्हा शिफारस करता येते. अजून तरी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिफारस अमान्य केलेली नाही. तरीही पुढील कायदेशीर लढाईच्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकारने पुन्हा शिफारस करण्याची खेळी केली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नियुक्तीबाबत राजभवनकडून काहीच कार्यवाही होत नसल्याने शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता आहे. राज्यपाल भाजप नेत्यांच्या कलाने वागत असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांकडून केला जात आहे.

Leave a Comment