हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे- फडणवीस सरकारने नगराध्यक्ष आणि सरपंच निवड थेट जनतेतून होणार असल्याचा निर्णय घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. नगराध्यक्ष आणि सरपंच निवड ही थेट जनतेतून होणार असेल तर मुख्यमंत्र्यांची निवडही थेट जनतेतून का करत नाही ? असा थेट सवाल त्यांनी सभागृहात केला. तसेच या निर्णयाबाबत फेरविचार करावा अशीही मागणी त्यांनी केली.
अजित पवार यांनी यावेळी लातूरचे उदाहरण दिले , जनार्दन पवार हे राष्ट्रवादीचे नेते त्यावेळी नगराध्यक्ष होते मात्र, त्याठिकाणी बहुमत काँग्रेसचं होतं. त्यामुळे बॉडी काँग्रेसची आणि नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा जनतेमधून निवडून आला होता. दोन्ही गट वेगवेगळ्या विचारसरणीचे होते. त्यामुळे विकासकामे करताना फार अडचण निर्माण होते असं अजित पवारांनी म्हंटल.
ग्रामपंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर होत नाहीत किंवा पक्षाच्या चिन्हावर होत नाहीत. मात्र इतर निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर होतात. त्यामुळे, ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांचीच दहशत राहील. धनाढ्य लोकांचाच वीजय होईल मग गरिबांनी काय करायचं असा सवाल करत पायंडा लोकशाहीसाठी घातक आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी अजित पवार यांनी केली.