हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर विरोधी पक्ष भाजपचे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत विचारलं असता वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक आहे असं म्हणत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. द्राक्ष, काजूपासून वाईन तयार होते. आपल्याकडे वाईन पिणाऱ्यांचं प्रमाण अतिशय अल्प आहे. जेवढी वाईन तयार होते, तेवढी आपल्या राज्यात खपत नाही. इतर राज्यांत आणि काही परदेशात निर्यात होते. काही देश पाण्याऐवजी वाईन पितात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण काहींनी जाणीवपूर्वक मद्य राष्ट्र वगैरे म्हणून त्याला महत्त्व दिलं आहे”, असं अजित पवार म्हणाले.
जनतेच नुकसान होईल असा कोणताही निर्णय सरकार घेणार नाही. मध्यप्रदेशने तर घरपोच मद्याचे निर्णय घेतले आहे. आपण तसे काही करत नाही. आपण केवळ वाईनला काही नियम आणि अटींसहित सुपर मार्केटमध्ये परवानगी देत आहोत. मात्र काही लोक व्हिडीओ काढून सरकारच्या विरोधात प्रचार करत आहेत असे अजित पवार म्हणाले.