हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कोरोना बाधितांचे प्रमाण वाढत आहेत. अशात प्रशासनाकडून मास्क वापरत खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सातारा जिह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस व बूस्टर डोस घेणाऱ्यांमध्ये काही नागरिक अद्यापि शिल्लक आहेत. मात्र, गेल्या तीन आठवड्यापासून जिल्ह्यात एकही लसीचा डोस शिल्लक नसल्याचे समोर आले आहे. वारंवार लसीच्या डोसचा तुटवडा भासत असल्यामुळे आरोग्य विभागाकडून लसींच्या डोसची मागणी करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण जास्त संख्येने आढळत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या कमी जास्त होत आहे. दरम्यान जे नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आरोग्य विभागात येत आहेत त्यांना लसीचा डोस देणे क्रमप्राप्त आहे. मात्र, सातारा जिल्ह्यात कोणतीही लस उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात एकूण 99 टक्के नागरिकांनी पहिला, 80 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. त्यामुळे अद्यापि लसीकरणापासून 20 ते 22 टक्के नागरिक दूर आहेत. परंतु लसच उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे.
सातारा जिल्ह्यात काेराेनामुळे आणखी एकाचा मृत्यू Click
सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क वापरण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्याबाबत वरिष्ठ पातळीवरून कानउघाडणी झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मास्कसक्तीचा निर्णय मागे घेतला आहे. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी मास्क वापरणे आवश्यक आहे. सध्याची परिस्थिती पाहता सातारा जिल्ह्यात 90 ते 95 रुग्ण असून, घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून केले जात आहे.