बाळासाहेबांचे कार्यकर्ते तुटतील पण तुमच्यासमोर वाकणार नाही; रोहित पवारांची भाजपला समज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । विधानसभेच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनातील दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे तरुण आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत चांगलीच फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. रोहित यांनी विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांवर टीका केली. भाजपाकडून शिवसेनेला आपलंसं करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत, भाजपाने तसा प्रयत्न करुन काहीही उपयोग नसल्याचे म्हटले. कारण, शिवसेना आमदार हे बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याप्रमाणेच निर्णयावर ठाम असणार आहेत, ते तुटतील पण तुमच्यासमोर वाकणार नाहीत असे रोहित यांनी म्हटले.

”विरोधी पक्षातील अनेक नेते शिवसेनेला कुठंतरी आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण, मला विरोधी पक्षांना एक गोष्ट सांगायचीय. ज्याप्रमाणे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव तुम्ही घेतलं, त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा घेतो. बाळासाहेब ठाकरे निर्णयाला ज्याप्रमाणे ठाम राहिले असते, त्याचप्रमाणे त्यांचे हे सर्व कार्यकर्तेही ठाम राहतील, असा विश्वास मला वाटतो. ते तुटतील पण तुमच्यासमोर वाकणार नाही, त्यामुळे कुणीही असा प्रयत्न करू नये,” असा टोलाच आमदार रोहित पवार यांनी भाजपाला लगावला.

”मी पुन्हा येईनवरुन रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. कुणीतरी म्हटलं शिवसेनेनं आमच्यासोबत यावं, पण मी लहानपणापासून जे काही मराठी शिकलोय, याचा अर्थ केवळ व्यक्तीगत बोलल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळे, आम्ही पुन्हा येईन म्हटले असते तर त्यात चंद्रकांत पाटील आले असते, इतर आमदारही आले असते. त्यात, शिवसेनेचाही समावेश झाला असता, त्यांनाही वाटलं असती की भाजपाची तीच इच्छा आहे, असे म्हणत रोहित यांनी फडणवीसांना टोला लगावला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment