हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दरडग्रस्त तळीयेमध्ये येऊन दुर्घटनेची पाहणी केली. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्तांची विचारपूस करून त्यांचे सांत्वन केले. तसेच अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. दरम्यान ही वेळ राजकारण वा टीका करण्याची नाही असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.
तळीयेची दुर्घटना अत्यंत भीषण आणि दुर्देवी आहे. या घटनेचं राजकारण करण्याची किंवा कुणावरही टीका करण्याची ही वेळ नाही. सध्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढणं आणि नुकसानग्रस्तांचं पुनर्वसन करणं महत्त्वाचं आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल.
अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. मात्र, एनडीआरएफ युद्धपातळीवर काम करत आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी केंद्र सरकार मदत करेल. पंतप्रधान आवास योजना आणि एनडीआरएफचं अनुदान घरे बांधण्यासाठी देण्यात येईल. नुकसानग्रस्तांना ज्या प्रकारची मदत हवी ती केंद्राकडून मिळेल, असं आश्वासन त्यांनी दिलं.