कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोडशी गावच्या हद्दीत दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाची जोरात धडक बसली. यामध्ये तिघेजण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. सोमनाथ जनार्दन पवार (वय 24), विक्रम माणिक निकम (वय 26), व अन्य एक जण (नाव समजू शकले नाही) (सर्व रा. कुमठे, ता. कोरेगाव) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सोमनाथ पवार व विक्रम निकम हे दुचाकीवरून कोल्हापूरला सोमनाथ पवार याचा विद्यापीठात फॉर्म भरण्यासाठी गेले होते. फॉर्म भरून झाल्यानंतर मंगळवारी ते त्यांच्या दुचाकीवरून क्रमांक (एम. एच. 11 बीवाय 4927) सातारच्या दिशेने निघाले होते. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोडशी गावच्या हद्दीत आल्यानंतर दुचाकीला पाठीमागून आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने जोराची धडक दिली. धडक इतकी भिषण होती की चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील सोमनाथ पवार व विक्रम निकम हे जागीच ठार झाले. त्यांच्याबरोबर असलेला एक लहान आठ ते नऊ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी घेऊन जात असताना तोही मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले.
धडक दिल्यानंतर अपघातस्थळावरून चारचाकी वाहनाने पलायन केले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महामार्ग विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील, पोलीस उपअधिक्षक रणजित पाटील, अपघात विभाग पोलीस इनामदार, जाधव, हायवे हेल्पलाईनचे इन्चार्ज दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, अमित पवार घटनास्थळी दाखल झाले. अपघात झाल्यावर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जाॅईन करा
Click Here to Join WhatsApp Group