हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये पुन्हा वाढ दिसून आलेली आहे. आज २४ कॅरेट सोन्याची किंमत ही १० ग्रॅम साठी ७४५ रुपयांनी वाढून ४७,०६७ रुपये इतकी झाली. त्याचवेळी चांदीचा दर हा प्रति किलो ४५०३५ रुपये इतका झाला. एका दिवसापूर्वीच चांदीची किंमतही ४२,९८५ रुपये प्रतिकिलो होती, जी आता प्रति किलोस २०५० रुपयांनी वाढली आहे.
आज भांडवली बाजारात मोठी पडझड झाली. त्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढल्याचे दिसून आले.जागोजागी जोरदार मागणी असल्याने तसेच सट्टेबाजांनी नवीन सौदे खरेदी केल्यामुळे फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याच्या किमतीत २१७ रुपयांनी वाढ होऊन ते ४६,८७१ रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. जून डिलीव्हरीसाठीचा सोन्याचा भाव २१७ रुपयांनी किंवा ०.४७ टक्क्यांनी वाढून ४६,८७१ रुपये प्रति दहा ग्राम झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये १३,१७४ या लॉटसाठी उलाढाल झाली. तर ऑगस्टमधील डिलीव्हरीसाठीचा सोन्याचा भाव २१० रुपयांनी किंवा ०.४५ टक्क्यांनी वाढून ४७,०५४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला.मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये ८,८५२ या लॉटसाठी उलाढाल झाली.
कोव्हिड-१९ या आजाराच्या विरोधात जगातील सर्व नेते अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रोत्साहनपर पॅकेज देऊन एकत्र आले असले तरी दीर्घकालीन आर्थिक मंदीचे मोठे सावट आज कमोडिटीज मार्केटवर दिसून आले. मागील आठवड्यात सोन्याच्या किंमती स्थिर होत्या. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी नव्या योजना जाहीर केल्या. यामुळे बाजारपेठेला प्रोत्साहन मिळण्यासाठी तसेच सुरक्षित मालमत्तेकडे गुंतवणूकादारांना ओढा कमी करण्याच्या दृष्टीने ही पावलं उचलली गेली.
कोरोनाच्या साथीमुळे आतापर्यंत २० लाखांहून अधिक नागरिक संसर्गग्रस्त असून दिड लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. भांडवली बाजारातील अनिश्चितता सोन्यात तेजी निर्माण करण्यास कारणीभूत ठरली. जगभरातील आर्थिक घडामोडी लवकरच सुरू होतील, या आशेने गुंतवणूकदार सोन्याची गुंतवणूक कमी करण्याच्या मनस्थितीत नाहीत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.