भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाला बाईक आणि पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने कंटेनर चालकाचा खून करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात यश आले आहे. आणि महत्वाचे म्हणजे खून करून फरार झालेल्या गुन्हेगाराने कुठलाही पुरावा मागे ठेवला नव्हता. मात्र लुटमार करताना या गुन्हेगाराने उच्चारलेला एक शब्द त्याचा गुन्हा पकडण्यास कारणीभूत ठरला. त्या एका शब्दावरून पोलिसांनी त्याला शोधून काढले. तसेच त्याच्यासह एका 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीलासुद्धा अटक करण्यात आले आहे. आरोपीचे नाव किरण नथ्थु पाटील असे आहे. तर आझम शाबल अन्सारी असे मृत ट्रक चालकाचे नाव आहे.
चालकाला गंभीर जखमी करून आरोपी फरार
मृत ट्रकचालक हा आपल्या साथीदारासह भिवंडी जवळील काल्हेर येथील राजलक्ष्मी कम्पाऊंडमध्ये ३० मे रोजी रात्रीच्या सुमारास ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून ट्रकच्या कॅबिनमध्येच झोपले होते. यादरम्यान आरोपी व त्याचा अल्पवयीन साथीदार चोरी करण्याच्या उद्देशाने एका दुचाकीवरून ट्रकजवळ आले. त्यानंतर ते अचानक ट्रकच्या कॅबिनमध्ये घुसले आणि चालकाला धमकी देत शिवीगाळ करू लागले. हे पाहून बाकी ट्रक चालक पीडित चालकाच्या मदतीला धावले. यावेळी आरोपी “हम गांववाले है किधर भी घुमेंगे तु क्या करेंगा” असे बोलत वाद घालून निघून गेला. यानंतर आरोपी पुन्हा ट्रकजवळ आला आणि त्याने रागाच्या भरात चालकाच्या डोक्यात दगड घातला आणि घटनास्थळावरून पळ काढला. या चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सापळा रचून पोलिसांनी अडकवले जाळ्यात
मृत चालकाचा साथीदार सत्यप्रकाश सदाशिव मिश्रा याने दिलेल्या फिर्यादीवरून नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक शरद बरकडे , सहाय्यक पोलीस निरीक्षक लतिफ मन्सुरी यांच्या पथकाने परिसरात राहणाऱ्या रेकॉडवरील गुन्हेगार व फिर्यादीशी झालेले आरोपीचे संभाषण आणि वर्णन यावरून तपासाला सुरुवात केली. यानंतर मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने भिवंडीतील शेलार नाका परिसरात सापळा रचून आरोपी किरण व त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबुल केला आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिली आहे.