कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
सहकार विभागाने गेल्या आठवड्यात नऊ खासगी सावकारांची घरे, दुकाने आणि त्यांच्या कार्यालयावर छापे टाकले होते. त्यापैकी दोघा खासगी सावकारांवर पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. केर्ली (ता. करवीर) येथील शहाजी विलास पाटील आणि सातार्डे (ता. पन्हाळा) येथील विनायक सुभाष लाड यांचा यामध्ये समावेश आहे.
२८ जानेवारी रोजी सहकार विभागाच्यावतीने नऊ खासगी सावकारांवर छापे टाकण्यात आले होते. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासगी सावकारांवर कारवाई झाली होती. सहकार खात्याच्या पथकाने यापैकी दोन सावकारांच्या घरातून दोन कोरे चेक, पाच खरेदीदस्त, ३१ संचकार दस्त व पाच कोरे स्टॅम्प असा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर आता ‘करवीर’चे सहाय्यक निबंधक बाळासाहेब पाटील यांनी शहाजी पाटील (केर्ली) यांच्यावर करवीर पोलिस ठाण्यात तर पन्हाळा सहाय्यक निबंधक चंद्रकांत इंगवले यांनी विनायक लाड (सातार्डे) यांच्यावर पन्हाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.