मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये जाणार आहेत. त्यासंदर्भात त्यांनीच स्वतः ट्विटर वरून घोषणा केली आहे. उद्या १४ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. मात्र भाजप प्रवेशासाठी उदयनराजेंनी ठेवलेल्या दोन अटी मान्य झाल्यावरच उदयनराजेंनी भाजप प्रवेशाचे जाहीर केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या सोबत आपल्या जागेची पोटनिवडणूक घेण्यात यावी. लोकसभा पोटनिवडणुकीत आपला पराभव झाल्यास आपल्याला लगेच राज्यसभेवर घेण्यात यावे अशा दोन अटी उदयनराजे यांच्याकडून भाजप नेतृत्वाला घालण्यात आल्या होत्या.
भाजप नेतृत्व देखील या अटींवर सर्व बाजूनी सारासार विचार करत होते. त्या मधल्या काळात उदयनराजे देखील मुसद्दी राजकरण्याप्रमाणे आपण राष्ट्र्वादीतच राहणार असल्याच्या बातम्या पेरत होते. त्यामुळे भाजप नेतृत्वावर उदयनराजेंचा दबाव वाढत होता. म्हणून राजेंच्या अटी मान्य करणे भाजप नेतृत्वाला आवश्यक वाटले. त्यांनी उदयनराजेंना हिरवा सिंग्नल दिला. तेव्हा उदयनराजे भोसले यांनी पक्षांतराची घोषणा केली.