आधी सीमावादावर भूमिका स्पष्ट करा अन् मगचं …; ठाकरेंचं मोदींना आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या समृद्धी महामार्गाच्या उदघाटनासाठी नागपूरला येणार आहेत. त्यातच महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या सर्व घडामोडींवर उद्या मोदी सीमावादावर बोलणार का? असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. मराठवाड्यातील घनसावंगी येथील साहित्य संमेलनात ते बोलत होते.

समृद्धी महामार्ग हा झालाच पाहिजे, माझ्या राज्याच्या राजधानीला आणि उपराजधानीला जोडणारा महामार्ग झालाच पाहिजे. आमच्या सरकारच्या काळात सुद्धा या महामार्गाचे काम अधिक वेगाने केलं आहे. रस्ते होतील आणि ते केलंच पाहिजे. परंतु एकीकडे समृद्धी महामार्गाचे उदघाटन करत असताना दुसरीकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमावादामुळे कर्नाटकाचा रस्ता महाराष्ट्रासाठी बंद करण्यात आला असेल तर देशाचे पंतप्रधान म्हणून तुम्ही त्यांना काय बोलणार आणि महाराष्ट्राला काय दिलासा देणार हे आधी स्पष्ट करा आणि मग समृद्धी महामार्गाचे उदघाटन करा असं आव्हान ठाकरेंनी मोदींना दिले.

काल आमचे खासदार अमित शहा यांना भेटून आले तरी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई म्हणतात की अमित शहांना भेटून उपयोग नाही. एवढी तुमची मस्ती वाढली ? कोणी यावं आणि आमचं अक्कलकोट मागावं, बेळगाव मागावे. उद्या सोलापूर मागताना आमच्या विठुरायावर अधिकार सांगतील. त्यामुळे माझी स्पष्ट मागणी आणि आग्रह आहे की महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर नरेंद्र मोदी यांनी आपली स्पष्ट आणि परखड भूमिका मांडावी असं उद्धव ठाकरेंनी म्हंटल.