हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्राचाळ घोटाळा प्रकरणात सुटका झाल्यानंतर आज त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी वेगळीच भीती व्यक्त केली. कदाचित भविष्यात संजय राऊतांना आणखी खोट्या केसेसमध्ये गोवण्याचा प्रयत्न होऊ शकेल असं त्यांनी म्हंटल.
उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून अनेक पक्ष फोडले गेले, अनेक पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जातोय. बेकायदेशीर अटक केली जातेय. खोट्या केसेस दाखल केले जात आहे. कालचा दणका न्यायालयाने केंद्राला दिल्यावरही कदाचित कुठल्या तरी खोट्या केसेसमध्ये परत संजयला गोवण्याचा प्रयत्न होऊ शकेल. कारण एवढ्या चपराकी नंतरही केंद्र सरकारला लाज वाटत नसती तर अशा घटना घडल्या नसत्या.
संजय राऊतांची अटक बेकायदेशीर आहे असं म्हणत कोर्टाने ईडीला फटकारलं होत त्याबाबत बोलताना यंत्रणा सुपारी घेऊन काम करत असतील तर बंद का करु नये? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्यांप्रमाणे वागत आहे. ज्याच्या अंगावर जा म्हटलं तर जात आहे. हे संपूर्ण जग बघत आहे. देश बघत आहे असं ठाकरे म्हणाले.