हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून अपक्ष आमदार आमच्यासोबत असल्याचा दावा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या इतर नेत्यांनी केला आहे. त्यामुळे निवडणुकीत आमदार फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अनुषंगाने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निवडणुकीत घोडेबाजार रोखण्यासाठी अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी आज संध्याकाळी वर्षा बंगल्यावर महाविकास आघाडी सरकारमधील महत्वाच्या मंत्र्यांसह अपक्ष आमदारांची बैठक बोलावली आहे. यावेळी महत्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी आज बोलवलेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री छगन भूजबळ, अशोक चव्हाण यांच्यासह महत्वाचे मंत्री उपस्थित राहणार आहेत. राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाकडेही पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे या बैठकीत उद्धव ठाकरे राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांना पाठिंबा देण्याविषयी अपक्ष आमदारांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
भाजपकडूनही सहाव्या जागेवरून धनंजय महाडिक तर शिवसेनेने संजय पवार यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. ही जागा जिंकण्यासाठी 42 मतांची गरज आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडे साधारण 30 च्या आसपास मते आहेत. त्यामुळे उर्वरित 12 मते मिळवण्यासाठी अपक्ष आमदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे आमदार फुटू नयेत म्हणून आज मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या आमदारांसह अपक्ष आमदारांना बैठकीसाठी बोलवले आहे.