हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी निवडणुकांमध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी देशातील 26 पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. आतापर्यंत या इंडिया आघाडीच्या दोन बैठका वेगवेगळ्या ठिकाणी पार पडल्या आहेत. मात्र आता या आघाडीचे तिसरी बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला होत आहे. या बैठकीपूर्वी महाविकास आघाडीतील मुख्य नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना, उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या इंडिया आघाडीतील प्रवेशावरती सुचक विधान केले आहे.
मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी अद्याप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना आमंत्रित करण्यात आलेले नाही. मात्र, प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत यायचं आहे का हे विचारावं लागेल. तसेच त्यांना या बैठकीत येण्याची इच्छा आहे का हे देखील विचारावे लागेल असे उद्धव ठाकरे यांनी म्हणले आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या सूचक वक्तव्यामुळे उद्याच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर उपस्थित असतील का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांसाठी ‘इंडिया’ची दारे अप्रत्यक्षरीत्या उघडी केल्याचे दिसून आले. यावेळी बोलताना त्यांनी, “प्रकाश आंबेडकर आणि आमची युती आम्ही २३ जानेवारीलाच जाहीर केलेली आहे. आम्ही शिवसेना आणि आंबेडकरांची युती आम्ही जाहीर केली आहे. पण राज्यातील महाविकास आघाडी की देशपातळीवरील ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत यायची इच्छा आहे का याबाबत त्यांच्याशी बोलावं लागेल” असे म्हणले आहे.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीच्या स्थापनेवेळी देखील आमंत्रित करण्यात आलेले नव्हते. त्यानंतर, इंडियाच्या बैठकीत उद्धव ठाकरे आमची बाजू मांडतील ते आमचे वकील म्हणून भूमिकांनी निभावत असे प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सांगण्यात आले होते. आता इंडिया आघाडीचे तिसरी बैठक मुंबईत पार पडत असताना उद्धव ठाकरे हे प्रकाश आंबेडकर यांच्या बाजूने बोलताना दिसले आहेत.