हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज दुपारी ४ वाजता ‘महा पत्रकार परिषद’ घेणार आहेत. वरळी डोम याठिकाणी एका मोठ्या सभागृहात ही पत्रकार परिषद पार पडेल. जनता न्यायालयात सत्य ऐका आणि विचार करा अशा आशियाचे बॅनर सुद्धा मुंबईत लागलेले आहेत. या पत्रकार परिषदेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाची उद्धव ठाकरे चिरफाड करणार आहेत. तसेच अनेक मोठे गौप्यस्फोट सुद्धा करणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस हा राजकारणातील हाय वोल्टेज दिवस ठरेल.
शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची 2013 साली जी निवड झाली, त्या निवडीचे दाखले आणि पुरावे उद्धव ठाकरे जनतेसमोर सादर करतील. महत्वाचे म्हणजे सध्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे 2013 साली शिवसेनेतच होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख निवडीवेळी राहुल नार्वेकर स्वतः उपस्थित असल्याचे फोटो सुद्धा ठाकरे लोकांना दाखवतील. येव्हडच नव्हे तर 2012 ते 2022 च्या दरम्यान झालेल्या सर्व प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठका याचे व्हिडिओ देखील दाखवले जातील. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला त्याची चिरफाड उद्धव ठाकरे करतील.
शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच आहे आणि पक्षप्रमुखाचे मत म्हणजे पक्षाचे मत असू शकत नाही, पक्षप्रमुख कोणाला काढून टाकत नाही असे निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं होत, त्यावरही उद्धव ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे. राहुल नार्वेकर यांनी हे काही निर्णय दिले त्याच्याविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल केली आहे. त्यातच आता थेट जनतेसमोर उद्धव ठाकरे नेमके कोणते गौप्यस्फोट करणार? काय काय पुरावे दाखवणार याकडे सर्वांचे लक्ष्य असेल. उद्धव ठाकरेंच्या या महापत्रकार परिषदेला संपूर्ण देशाबाहेरीतील पत्रकारांनी यावं असं आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.