हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. आज उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असलेल्या 40 आमदारांवर निशाणा साधला. “कालच नागपंचमी झाली. नागाला कितीही दूध पाजलं तरी तो चावतोच, अशी बोलतात. तसंच या सर्वांनाही निष्ठेचं दूध पाजलं, पण ही औलाद गद्दार निघाली,” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी घणाघाती टीका केली.
जळगाव आणि वाशिममधून अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकऱ्यांनी आज उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. त्यावेळी ठाकरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. जळगावमध्ये भाजपनं गुलाब पाहिला पण आता त्यांना शिवसैनिकांचे काटे बघायचे आहेत, असा इशारा ठाकरे यांनी भाजपला दिला.
यावेळी ठाकरे यांनी आता मी राज्यभर फिरणार असून सविस्तरपणे बोलणार आहे. तोपर्यंत शिवसैनिकांनी पक्षाच्या सदस्य नोंदणीवर भर द्यावा. एकदा काय तो सोक्षमोक्ष व्हायचा तो होऊन जाऊ द्या, विधानसभेच्या निवडणुका घ्या मग दाखवून देऊ, असा इशाराही ठाकरे यांनी शिंदे गटाला व भाजपला दिला आहे.