हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तैलचित्र अनावरून शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधला. “मी शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्याला वंदन करुन आलो. आज तिकडे विधान भवनात तैलचित्राचं अनावरण होतंय. ज्या कलाकाराने ते चित्र चितारलं असेल त्यांना पुरेसा वेळ दिला गेला असेल का? ते महत्त्वाचं आहे. घाईगडबडीत काहीतरी रंगवून घ्यायचं आणि हे तुझे वडील. तर अजिबात ते चालणार नाही. दुसऱ्याचे वडील चोरताना हे लक्ष ठेवा नाहीतर तेही तुम्ही विसरायचे. इकडे शिवसेनाप्रमुखांचा विचार, तिकडे मोदी का आदमी आणि तिकडे शरद पवार गोड माणूस. नक्की कोणाची बोटं लावणार तुम्ही? असा सवाल ठाकरेंनी विचारला.
आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीचं सरकार असताना सरकार का पाडलं? तर हिंदुत्व सोडलं आणि शरद पवारांच्या आहारी गेले. आणि काल सांगतात की, शरद पवार खूप गोड माणूस. मी फोनवर त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. मग मी काय घेत होतो? ही अशी सगळी माणसी आहेत. तुमची कृती चांगली आहे. बाळासाहेबांचे तैलचित्र लावत आहेत. त्याचा अभिमान आहे. पण त्यामागचा हेतू वाईट आहे.
आज गद्दार विकले जाऊ शकतात. ते खोक्यांनी विकले किंवा घेता येऊ शकतात. पण जे आहे ते विकलं किंवा विकत घेता येऊ शकत नाही. नेत्याला एखादी माहिती पडते आणि पक्षप्रमुखाला पडत नाही असं थोडीना होतं? संजय तुला पोलंडचा पंतप्रधान भेटला, मला तर थेट अमेरिकेचे अध्यक्ष भेटले.
मला म्हणाले की, मी आज इथे आलो, उद्या मी भाजपात चाललोय. कारण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या घरावर रेड पडली आणि कागदपत्रे सापडली अशी बातमी ऐकलीय. मग लगेच आपल्या इथल्या खोकेविरांनी सांगितलं की, अरे तू कसं जगणार? न झोपेचा पत्ता, न कसलं काही. भाजपात ये किंवा मिंधे गटात ये, बघ सगळं मस्त, असे ठाकरे यांनी म्हंटले.