हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडखोरी नंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आमदार, खासदारांनंतर अनेक प्रमुख शहरातील माजी नगरसेवक शिंदे गटात सामील होऊ लागले आहेत. या एकूण सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काही दिवसात राज्याचा दौरा करणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे.
संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले, आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सध्या सुरु आहे. त्यांच्या दौऱ्याला राज्यातील तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याच्या दौऱ्यावर जाणार असून त्याचे नियोजन सुरू आहे. येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील वातावरण शिवसेनामय झालेलं असणार आहे असं संजय राऊत यांनी म्हंटल .
दरम्यान, सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशी वरूनही संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला. केंद्रीय तपास यंत्रणा कोणाच्या दबावाखाली काम करत आहे हे सगळ्यांना माहिती आहे. जे लोक देशहिताचे प्रश्न विचारतात, त्या सगळ्यांचा आवाज दाबण्याचे काम सध्या सुरू आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी संजय राऊत कोणीही असेल जो प्रश्न विचारेल त्यांना बोलावलं जातं घाबरवण्याचे प्रयत्न केले जातात, जेलमध्ये टाकल जातं. मात्र आम्ही या सगळ्यासाठी तयार आहोत, असे राऊत यांनी म्हटले आहे.