नागपूर प्रतिनिधी | सध्या नागपूर येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. गेले तीन दिवस हे अधिवेशन शेतकरी कर्जमाफी, सावरकर आदी विषयांनी प्रचंड गाजले. आजही सभागृहात तेच चित्र पाहायला मिळाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना विरोधी पक्ष भाजपवर जोरदार हल्ला केला.
मी काही भाजपची कायम पालखी वाहणार नाही, हा शब्द मी बाळासाहेबांना दिला होता असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. भाजपचे ओझे आता आम्ही उतरवून टाकू. चहापेक्षा किटली गरम असं कुणीतरी म्हणाले. मात्र किटली पुसणारे फडके पण गरम होऊ लागले आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
आमच्या सरकारने असं ठरवलंय की कमी बोलायचं आणि जास्त काम करायचं. आमचं सरकार गरिबांचं, सर्वसामान्यांचं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले हे तीन पक्षांचे तीन चाकी सरकार आहे. हे रिक्षा सरकार आहे. मात्र आमचं गरिबांचं सरकार आहे, गरिबांना बुलेट ट्रेनपेक्षा तीन चाकी रिक्षाच परवडते”, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला .
दरम्यान काल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर विधानसभेत टीकास्त्र सोडले होते . देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात ‘सामना’ वृत्तपत्र वाचून दाखवत, शिवसेनेने शरद पवारांवर केलेल्या टीकेकडे लक्ष वेधलं. इतकंच नाही तर या सरकारला जनादेश नाही, जनादेश भाजपला आहे. स्वार्थासाठी एकत्र आलेल्या तीन पक्षांनी सरकार स्थापन केलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.