2 वर्षांच्या भाचीवर कारमध्ये काकाने केला बलात्कार अन्….

बंगळुरू : वृत्तसंस्था – बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोन वर्षांच्या मुलीवर तिच्याच 31 वर्षीय काकाने कारमध्ये बलात्कार करून तिची हत्या केली आहे. अटीबेले येथील रहिवासी असलेल्या या कार चालकाला त्याच्या दोन वर्षाच्या भाचीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

रविवारी 20 मार्च रोजी तिचा काका चिकन खरेदी करण्यासाठी भाचीला त्याच्या घरातून घेऊन गेला होता. दरम्यान त्याने आपल्या कारमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.यानंतर जेव्हा ही मुलगी रडायला लागली, तेव्हा त्याने तिला जोरात कानाखाली मारली आणि ती पीडित मुलगी जागीच बेशुद्ध पडली. यानंतर या नराधम काकाने तिला रुग्णालयात नेले. मात्र रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.

यानंतर पोलिसांनी संशयिताची चौकशी सुरु केली. कारच्या सीटवरून पडल्यामुळे या चिमुकलीचा मृत्यू झाल्याचे या आरोपीने सांगितले. समोरच्या सीटवर बसलेली मुलगी आरोपीनं ब्रेक लावल्यामुळं खाली पडली आणि तिला गंभीर दुखापत झाली, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. यानंतर पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली.