कराड दक्षिणेत ग्रामपंचायतींवर डॉ. अतुल भोसलेंचे निर्विवाद वर्चस्व : भाजपाचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
अत्यंत चुरशीने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये कराड दक्षिणेतील ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तसेच सर्वाधिक सदस्यपदीदेखील भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांचे समर्थक उमेदवार विजयी झाल्याने, या ग्रामपंचायत निवडणुकीत कराड दक्षिणवर पुन्हा एकदा भाजपाचा वरचष्मा दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे.

कराड दक्षिणमधील सुमारे 20 ग्रामपंचायतींसाठी नुकतीच मतदान प्रक्रिया पार पडली. यापैकी 3 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. ज्यामध्ये गोंदी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासह सर्व जागांवर डॉ. अतुल भोसले समर्थकांची बिनविरोध निवड झाली होती. दरम्यान, 20 पैकी 17 ग्रामपंचायतींसाठी रविवारी (ता. 18) मतदान प्रक्रिया पार पडली. या ग्रामपंचायतींचे निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आले.

कराड दक्षिणमधील सुमारे 11 ग्रामपंचायतींमध्ये भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले समर्थक असलेले सरपंचपदाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने गोंदीसह दुशेरे, आणे, वनवासमाची, वडगाव हवेली, ओंडोशी, आटके, विजयनगर, जुळेवाडी इत्यादी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. याचबरोबर कराड दक्षिणमधील विविध ग्रामपंचायतीत सुमारे 100 हून अधिक भोसले समर्थक उमेदवार सदस्यपदी निवडून आल्याने, सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्य निवडून आणण्यामध्ये भाजपाने वरचष्मा राखल्याचे दिसून येत आहे.

कराड दक्षिणमधील अनेक गावांमध्ये आ. पृथ्वीराज चव्हाण, ॲड. उदयसिंह पाटील व अविनाश मोहिते समर्थकांनी एकत्रित आघाडी केली असतानाही, भाजपाचे नेते डॉ. अतुल भोसले समर्थक उमेदवारांनी तुल्यबळ लढत देत अनेक ठिकाणी मोठा विजय संपादन केला आहे. त्यामुळे कराड दक्षिणेत ग्रामपंचायत निवडणुकीत डॉ. अतुल भोसले समर्थकांचा करिष्मा पुन्हा एकदा दिसून आल्याने, भाजप समर्थकांत उत्साहाचे वातावरण पसरले आहे. या विजयाबद्दल य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले व श्री. विनायक भोसले यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

विजय मात्र भोसले समर्थकांचाच!
कराड दक्षिणमधील काही गावांमध्ये भाजपाचे नेते डॉ. अतुल भोसले यांना माननाऱ्या दोन गटांनी एकाच गावामध्ये परस्परविरोधी पॅनेल उभे करुन चुरस निर्माण केली होती. विशेषत: वडगाव हवेली, आटके अशा गावांमध्ये भोसले समर्थक असणारेच उमेदवार परस्परविरोधी पॅनेलमधून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. अशावेळी वडगाव हवेली येथे कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांच्या नेतृत्वाखालील गटाचा; तर आटके येथे कृष्णा कारखान्याचे संचालक गुणवंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाचा विजय झाल्याने, हा भोसले समर्थक गटाचाच विजय मानला जात आहे.