चेन्नई : वृत्तसंस्था – डॉ. भालचंद्र काकडे यांचा ऑक्सिजनअभावी चेन्नईमध्ये मृत्यु झाला आहे. ते ऑक्सिजन क्षेत्रात संशोधन करत होते. डॉ. भालचंद्र काकडे यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदवी घेतली होती. डॉ. भालचंद्र काकडे यांनी ऑक्सिजन, हायड्रोजन अशा वायूंपासून इंधनपुरक उर्जा निर्माण करुन त्याद्वारे रेल्वेही धावू शकेल असे संशोधन केले आहे.
डॉ. भालचंद्र काकडे यांनी इंधननिर्मिती व प्लॅटिनमच्या विविध संशोधनात आंतरराष्ट्रीय स्तरावर ७ पेटंट मिळवले आहेत. त्यांनी पुण्यातील रासायनिक प्रयोगशाळा, जपानमधील टोकियो इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इंधननिर्मितीबाबत संशोधन केले आहे. सुमारे २० वर्षे त्यांनी संशोधन केले आहे. डॉ. भालचंद्र काकडे हे चेन्नईतील एसआरएम रिसर्च इन्स्टिटयुटमध्ये कार्यरत होते. त्यांची पत्नीसुद्धा तिकडेच संशोधन करत आहे.
कोरोनाने सध्या थैमान घातले असताना लॅबमध्ये काही जण पॉझिटिव्ह सापडले. त्यानंतर डॉ. भालचंद्र काकडे यांची तपासणी केली असता त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यावर त्यांना शासकीय कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. यानंतर त्यांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी विद्यार्थी यांनी खूप धडपड केली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. रुग्णातील ऑक्सिजन पुरवठा संपल्याने डॉ. भालचंद्र काकडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.