मुंबई । राज्यातील महत्त्वाचे नेते राज्यपालांच्या भेटीगाठी घेत असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारं पत्र राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लिहिलं आहे. मात्र, विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास राज्यपाल आग्रही असून ‘विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या व भवितव्याच्या या प्रश्नात कुठल्याही राजकारणाला थारा देऊ नये,’ अशी विनंती राज यांनी राज्यपालांना केली आहे.
राज यांनी राज्यपालांना लिहलेल्या पत्रातून राज्यपालांच्या परीक्षा घेण्याच्या आग्रही भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले. ‘कोरोनामुळं उद्भवलेल्या परिस्थितीमुळं संपूर्ण देश गेले दोन महिने टाळेबंदीत आहे. मुंबई आणि पुण्याची परिस्थिती पाहता टाळेबंदी किती दिवस राहील हे कोणीच सांगू शकत नाही. टाळेबंदी शिथिल झाली तरी कोरोना संपला असं होणार नाही. अशा परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी,’ असा थेट सवाल राज यांनी आपल्या पत्रातून राज्यपालांना केला आहे.
या पत्रात त्यांनी पुढे लिहलं आहे. ‘कोरोनाचा प्रादुर्भाव किती भयंकर आहे याची कल्पना आपल्याला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर काढून त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आरोग्य धोक्यात घालण्यामागचं नक्की प्रयोजन काय?अर्थव्यवस्थेचं अपरिमित नुकसान होत असतानाही केवळ जीव वाचावे म्हणून संपूर्ण देशानं टाळेबंदी केली. मग याच न्यायानं विद्यार्थ्यांचं आरोग्य लक्षात घेऊन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यायला काय हरकत आहे? परीक्षा रद्द करणे म्हणजे सरसकट पास करणे असा याचा अर्थ होत नाही. आधीच्या सेमिस्टर्सच्या, विद्यापीठातील अंतर्गत गुणांच्या आधारावर किंवा विद्यार्थ्यांना काही प्रोजेक्ट्स देऊन किंवा अन्य मार्गानं अंतिम परीक्षेचा निकाल लावता येईल’ असं मत राज यांनी आपल्या पत्रात राज्यपालांकडे व्यक्त केलं.
दरम्यान, विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षावरून सध्या राज्यपाल व राज्य सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा विचार विद्यापीठ अनुदान आयोगानं करावा, असं मत राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे. तर, राज्यपाल परीक्षा घेण्याबाबत आग्रही आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडत सदर अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या जाव्यात अशीच मागणी केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”