कानपूर : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पनकी येथील एका दाम्पत्याने त्यांच्या तृतीतपंथीय मुलीचा विवाह शास्त्री नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाशी लावून दिला. लग्नाच्या पहिल्या रात्री हा सगळा प्रकार तरुणाच्या लक्षात आल्याने या दाम्पत्याचे बिंग फुटले आहे. पत्नी तृतीयपंथी असल्याचे लक्षात येताच घरात वाद निर्माण झाला. यानंतर हि तरुणी आपल्या माहेरी निघून गेली. या प्रकरणी तरुणाने काकादेव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या तरुणाने तृतीयपंथी पत्नी, सासू-सासरे आणि लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थाविरोधात तक्रार दाखल केली आहे. एकूण ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
शास्त्री नगरमध्ये राहत असलेल्या पियूषचा विवाह २८ एप्रिल २०२१ रोजी झाला होता. तरुणी तृतीयपंथी असल्याची माहिती तिच्या नातेवाईकांना होती. मात्र यानंतरही विजय नगरमध्ये राहणाऱ्या सत्यदेव चौधरींनी लग्नासाठी मध्यस्थी केली. लग्नानंतर सत्य परिस्थिती समोर येताच कुटुंबाला मोठा धक्का बसला. आपण लग्न करण्यास तयार नव्हतो. पण कुटुंबियांनी जबरदस्तीनं विवाह लावून दिले असे या तरुणीने सांगितले आहे. यानंतर आपली पोलखोल होताच हि तरुणी माहेरी निघून गेली.
आपली फसवणूक झाल्याने पियूषने ८ जणांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सल्ला घेण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला तरुणाची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. पण नंतर या तरुणाने पत्नीचे वैद्यकीय अहवाल आणले. ते पाहून पोलिसांचा त्याच्यावर विश्वास बसला. यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे.