औरंगाबाद – लसीकरणामुळे प्रतिकारशक्तीत वाढ होत असल्याने कोरोना संक्रमणाला अटकाव होणार आहे. 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींची प्रतिकारशक्ती या लसीकरण मोहिमेने प्रबळ होणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या संक्रमणाला रोखण्यासाठी लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर आज औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पंधरा ते अठरा वयोगटातील मुलां-मुलींना लसीकरण देण्यास प्रारंभ झाला. लसीकरण मोहिमेचा शुभारंभ वाळूज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते झाला. 15 ते 18 वयोगटातील औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना ची पहिली लस ज्योती खैरनार या विद्यार्थिनीला वाळूज प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात आली. यावेळी आमदार प्रशांत बंब, जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई शेळके, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, वाळूजच्या सरपंच सईदा नबी पठाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, पंचायत समिती सदस्य दीपक बडे, ज्योती गायकवाड यांच्यासह वाळूज प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक यांच्साह आशासेविका यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, लसीकरण मोहिमेमध्ये जिल्ह्याने चांगले काम केले आहे. 15 ते 18 वयोगटातील सर्व मुलांचे लसीकरण लवकरात लवकर व्हावे यासाठी आरोग्य यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करुन जिल्हा लसवंत करावा, असेही ते म्हणाले. आमदार बंब यावेळी म्हणाले की, ओमायक्रॉनला अटकाव करण्यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे. लसीकरणाला पर्याय नाही. लसीकरण करुन जिल्हा कोरोनामुक्त करुया, असेही ते म्हणाले.