पुणे प्रतीनिधी | लक्ष्मण माने यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना राजीनामा मागितल्याने वंचित बहुजन आघाडीचे राजकारण ढवळून निघाले आहे. अशात वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर हे प्रकाश आंबेडकर यांची भूज सांभाळण्यासाठी पुढे सरसावले आहेत. लक्ष्मण माने यांचे राष्ट्रवादीशी संबध आहेत. त्यामुळे त्यांचे बोलवते धनी वेगळे आहेत असे गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होतो. मी भाजपमध्ये होतो. माझे भिडे गुरुजींशी सलोख्याचे संबंध होते. या सर्व मुद्द्यांची मी उत्तरे देवून झाली आहेत. त्यामुळे त्यांचा अध्यक्षासोबत काय मतभेद आहेत ते त्यांनी बोलून घ्यावे असे बेछूट आरोप केल्यावर तुमचा बोलवता धनी कोणी वेगळाच आहे अशी कुणकुण लागते. महासचिव पदी माझे नाव लक्ष्मण माने यांनी सुचवले होते. तेच आता मला आरएसएसचा म्हणू लागले आहेत त्यामुळे त्यांचा बोलवता धनी कोणी वेगळाच आहे असे वाटते असे गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
लक्ष्मण माने यांना प्रदेशाध्यक्ष पद पाहिजे आहे. ते पद त्यांना दिले जात नाही म्हणून ते अध्यक्षांवर आरोप करत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीच्या तीन ते चार बैठकी झाल्या आहेत. त्या बैठकामध्ये त्यांनी त्यांचे आक्षेप बोलून दाखवायला हवे होते. त्यांचे राष्ट्रवादीसोबत संबंध आहेत. त्यामुळे त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे असे गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.