सोलापूर । कोरोनाच्या संकटाच्या काळात प्रत्येकाच्या मोबाइलवर वाजणाऱ्या कॉलर ट्यूनमागे नेमके काय षडयंत्र आहे, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ‘मागील ३ महिन्यांपासून प्रत्येकाच्या मोबाइलवर कोविडची कॉलर ट्यून येतेय. या माध्यमातून लोकांना विनाकारण भीती दाखवली जातेय. यामागे नेमकं काय षडयंत्र आहे याचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावा,’ अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
देशात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून प्रत्येकाच्या मोबाइलवर एक कॉलर ट्यून वाजत आहे. कोरोनापासून सावध कसे राहायचे याची माहिती या कॉलर ट्यूनमधून दिली जाते. देशात अनलॉकचे पर्व सुरू झाल्यानंतर सूचनांमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. मात्र, कॉलर ट्यून सुरूच आहे. नंबर डायल करताच सुरू होणाऱ्या या ट्यूनमुळं लोक त्रस्त आहेत. प्रकाश आंबेडकरांनी यामागे षडयंत्र असावं, असा संशय व्यक्त केला आहे. ‘कोरोनाच्या नावाखाली सरकार सर्वसामान्य लोकांना ब्लॅकमेल करत आहे. एकाकी जीवन जगण्यास भाग पाडलं जात आहे, असा आरोप आंबेडकरांनी यावेळी केला.
कोरोनापेक्षा जास्त लोक पूर्वी टीबीने दगावले तेव्हा कुठं लॉकडाऊन होत
कोरोनापेक्षा जास्त लोक पूर्वी टीबीने दगावले होते, तेव्हा कुठंही लॉकडाऊन झालं नव्हतं. करोनाच्या लॉकडाऊनमुळं लोकांची उपासमार होत आहे. उद्योगधंदे बंद आहेत. लोकांना नोकऱ्या नाहीत. त्यातच कोरोनाची कॉलर ट्यून लावून भीती निर्माण केली जात आहे. ३ महिन्यांनंतरही ही रिंगटोन बदलली नाही, यामागे काय षडयंत्र आहे, हे मोदींनी सांगितलं पाहिजे,’ असं आंबेडकर म्हणाले. ‘लोकांचा आयुष्य सरकारनं उद्ध्वस्त केलंय. लॉकडाऊनमुळे अनेक लोक मानसिक रोगी झाले आहेत. आरोग्य यंत्रणेमुळं लोक वाचत आहेत, लॉकडाऊनमुळे नाही,’ असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला. ‘यापुढं कुठल्याही तारखेची वाट न बघता सर्वांनी नेहमीसारखं जीवन जगायला सुरुवात करावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”