सांगली | संजयनगर परिसरात असणाऱ्या लव्हली सर्कल जवळ मित्रांनी केलेल्या मारहाणीत भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. फिरोज शेअरली शेख असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सदरची घटना हि बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी तातडीने शेख याला सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून खून करणाऱ्या दोघा संशयितांना अटक केली आहे. महेश प्रकाश कांबळे आणि सागर गणपती नरुटे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
संशयित महेश कांबळे आणि सागर नरुटे हे दोघंही भाजी विक्रीचा व्यवसाय करत असतात. मृत शेख हा महेश कांबळे यांच्याकडून उधारीवर भाजीपाला हा विक्रीसाठी घेत होता आणि विक्री झाल्यानंतर घेतलेल्या मालाचे पैसे कांबळे याला देत होता. आधी माल घेऊन नंतर पैसे तो देत होता. अशा पद्धतीने त्याचा व्यवसाय सुरु होता.
याच व्यवसायातून कांबळे आणि नरुटे या दोघांसोबत त्याची ओळख झाली होती. शेख याला दारूचे व्यसन असल्याने कांबळे याच्या कडून घेतलेल्या मालाचे पैसे तो वेळेवर देत नव्हता. अशातच घेतलेल्या मालाची थकबाकी मोठ्या प्रमाणात झाली होती. यातून कांबळे आणि शेख यांच्यात वाद सुरु होता.
मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शेख हा दारूच्या नशेत लव्हली सर्कल येथून निघाला होता. तेव्हड्यात कांबळे आणि नरुटे यांनी शेख याला मंगळवार बाजार ते लव्हली सर्कलला जाणाऱ्या आतील रस्त्यावर घेऊन गेले. त्याठिकाणी त्याला दोघांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तेथेच टाकून कांबळे आणि नरुटे यांनी तेथून पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पहाटेच्या सुमारास शेख याला तातडीने सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र, त्याचा यापूर्वीच मृत्यू झाल्याचे तिथल्या डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. दरम्यान, घडलेल्या घटनेनंतर संजयनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी पथकांसह घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. अवघ्या सहा तासात तपासाची चक्रे फिरवून संजयनगर पोलिसांनी कांबळे आणि नरुटे यांच्या मुसक्या आवळल्या.